मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष लक्ष देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यासाठी एम-इंडिकेटरवरच रेल्वे पोलिसांचा (आरपीएफ) हेल्पलाइन नंबर देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या मोबाइल अॅप सुरक्षेचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी अशा प्रकारची सुरक्षा महिला प्रवाशांना खरोखरच उपयोगी पडेल, असे ते म्हणाले. महिला प्रवाशांबाबतीतले गुन्हे गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढत असून त्यामुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही जीआरपीची असल्याने त्यांच्याकडून महिला डब्यात सुरक्षाही पुरविण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वेकडून आरपीएफही (रेल्वे सुरक्षा दल) देण्यात आले आहेत. आता आरपीएफकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेकडून १३११ आणि मध्य रेल्वेकडून १२७५ हे हेल्पलाइन नंबर देण्यात आले आहेत. धोका वाटल्यास त्याचा वापरही प्रवाशांकडून केला जातो. महिला प्रवाशांना तत्काळ सुरक्षा उपलब्ध व्हावी यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून हेल्पलाइन नंबर एम-इंडिकेटरवर देण्याचा निर्णय घेतला आहे. एम-इंडिकेटरवर पश्चिम आणि मध्य रेल्वेचा हेल्पलाइन नंबर देण्यात आला असून यात आपत्कालीन परिस्थितीसाठी एसएमएस सेवाही उपलब्ध करण्यात आली आहे. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नातेवाइकांनाही एसएमएस जावा आणि त्यांनाही संपर्क साधता येण्यासाठी यामध्ये दोन नातेवाइकांचे नंबर उपलब्ध करून देण्याची सोयही करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने महिला प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेकरिता रेल्वेचे अॅप
By admin | Updated: January 10, 2015 01:47 IST