Join us
Daily Top 2Weekly Top 5

ट्रायमॅक्स कंपनीला नियमानुसारच काम

By admin | Updated: September 5, 2015 01:11 IST

एसटी महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीला इलेक्ट्रॉनिक मशीनचे काम देताना त्या कंपनीच्या सोयीनुसार निवदेतील अटी घातल्या, या संदर्भात चौकशी करण्याचे

मुंबई : एसटी महामंडळाने ट्रायमॅक्स कंपनीला इलेक्ट्रॉनिक मशीनचे काम देताना त्या कंपनीच्या सोयीनुसार निवदेतील अटी घातल्या, या संदर्भात चौकशी करण्याचे पत्र परिवहन मंत्र्यांना दक्षता विभागाने दिल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या ३ सप्टेंबरच्या अकांत प्रसिद्ध झाले होते. परंतु हे काम नियमानुसारच काम देण्यात आल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला. महामंडळाकडून सांगण्यात आले की, शासनाने अवलंबविलेल्या व महामंडळाने प्रथमच अंगिकारलेल्या ई-निविदा पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे. नवीन प्रकल्पासाठी निविदेअंतर्गत सहा निविदाकारांनी निविदा प्रपत्रे विकत घेतली आणि या निविदासाठी ५४ दिवसांचा कालावधी निविदा भरण्यासाठी देण्यात आला होता. मात्र ट्रायमॅक्स व्यतिरिक्त कोणत्याही निविदाकाराने निविदा भरण्यामध्ये स्वारस्य दाखविले नाही. तसेच सध्याच्या प्रकल्पाचा संपुष्टात येणारा डिसेंबर २0१५ मधील मुदतवाढ कालावधी व प्रकल्प अंमलबजावणीस लागणारा यापुढील किमान नऊ महिन्यांचा कालावधी इत्यादी बाबी लक्ष घेवून ट्रायमॅक्स या निविदाकाराची नविन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सेवा पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली. नविन प्रकल्पासाठीच्या सेवा पुरवठादाराच्या नेमणूकी दरम्यान महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांची दोन पत्रे विविध मुद्द्यांबाबत प्राप्त झालेली होती. त्यांनी पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा शासनास सविस्तर खुला करण्यात आलेला होता, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.