Join us  

मेट्रोच्या कामामुळे वाहतूककोंडी; मुंबईकरांनो, थोडा संयम बाळगाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 6:48 AM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, आता तर माहिम येथील नयानगरमध्ये भुयारी मार्गाचे खोदकामही सुरू आहे.

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या पहिल्या भुयारी मेट्रो-३ प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, आता तर माहिम येथील नयानगरमध्ये भुयारी मार्गाचे खोदकामही सुरू आहे. नयानगर येथील कामादरम्यान १० मीटर बोगदा खणण्यात आला असून, मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. विशेषत: मेट्रो-३ च्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी रस्ते अरुंद करण्यात आले आहेत. परिणामी, वाहतूककोंडीत वाढ होत आहे, शिवाय सुरक्षेच्या कारणात्सव ठिकठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मेट्रो-३ हा प्रकल्प २०२१ साली कार्यान्वित होणार आहे. परिणामी, तोवर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजणार आहेत. मात्र, तरीही उज्ज्वल भविष्याचा विचार करता, मेट्रोच्या कामामुळे होणारा त्रास सहन करावाच लागणार आहे. दरम्यान, मेट्रो-३च्या कामादरम्यान ठिकठिकाणी करण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली असून, अशाच काहीशा वाहतूक व्यवस्थेचा आढावा ‘लोकमत बॉयोस्कोप’मधून घेण्यात आला आहे.बीकेसी वाहतूक विभागाच्या हद्दीतील भुयारी मेट्रो मार्ग प्रकल्प ३ दरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतुकीमधील अडथळे, धोका लक्षात घेता, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विद्यानगरी मेट्रो स्थानक येथील उत्तर भारतीय संघ भवन ते संदीप पाटील अकॅडमी/विजयनगर रोड जंक्शन असा शारदादेवी रोड, वांद्रे (पूर्व) हा रस्ता १४ नोव्हेंबरपासून चार वर्षे वाहतुकीकरिता बंद आहे.दक्षिण वाहिनीवर वाहतूक करणारी वाहने ही टीचर्स कॉलनी, वांद्रे (पूर्व) पासून पुढे शारदादेवी रोडपासून न्यू लिंक रोड, उत्तर भारतीय संघ भवनच्या पाठीमागून पुढे डॉ. आंबेडकरनगर जंक्शनवरून डावे वळण घेऊन वांद्रे-कुर्ला संकुलात जात आहे. उत्तर वाहिनीवर वाहतूक करणारी वाहने ही वांद्रे-कुर्ला संकुल येथून वेस्टर्न एक्स्प्रेसवर जाण्याकरिता डॉ. आंबेडकरनगर (कनकीय कॉम्प्लेक्स) येथे उजवे वळण घेऊन, न्यू लिंक रोडवर येऊन तेथून डावे वळण घेऊन, उत्तर भारतीय संघ भवन येथून पुढे टीचर्स कॉलनीवरून जात आहेत.उत्तर वाहिनीवरील वाहने ही वांद्रे-कुर्ला संकुल ते खेरवाडी पुढे वेस्टर्न एक्स्प्रेस उत्तर वाहिनीवरील वाहने, ही वांद्रे-कुर्ला संकुल ते खेरवाडी पुढे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेला जाण्यास डॉ. आंबेडकर जंक्शन ते प्रोफेसर जे. एल. शिरशेकर मार्ग ते खेरवाडी अशी जात आहेत.बस क्रमांक २१९ या बसचा मार्ग शारदादेवी रोड वरून बंद असून, ही बस न्यू लिंक रोड, उत्तर भारतीय संघ भवन या नव्या मार्गावरून धावत आहे. शारदादेवी रोडच्या पूर्व बाजूला ज्या सोसायटी/संस्था व इतर कार्यालय असतील, त्यांनी जाण्या-येण्याकरिता न्यू लिंक रोडचा वापर करावा. न्यू लिंक रोड हा पूर्णपणे नो पार्किंग करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे बदल विद्यानगरी मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंतचे आहेत.मेट्रो मार्ग प्रकल्प ३ योजनेंतर्गत पॅकेज ७ मरोळ नाका, मेट्रो स्थानक या कामाकरिता लोकहिताच्या दृष्टीने व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. कामादरम्यान रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, म्हणून ५ नोव्हेंबरपासून ते मेट्रो प्रोजेक्ट-३ फेज-७ चे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.मरोळ मरोशी रोडवर मरोळ नाका ते लोकभारती जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग आहे. त्या अनुषंगाने मरोळ नाका ते लोकभारती जंक्शनकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील वाहतूक लोकभारती जंक्शनपर्यंत एकदिशा आहे. मरोळ मरोशी रोड ते मरोळ नाक्याकडे येणाºया दक्षिण वाहिनीवरील वाहतुकीस मरोळ मरोशी रोडवर लोकभारती जंक्शनच्या पुढे गाड्यांना बंदी(नो एन्ट्री) आहे.मरोळ मरोशी रोडकडून मरोळ नाक्याकडे येणारी वाहतूक लोकभारती जंक्शन या ठिकाणी डावे वळण घेऊन, लोकभारती रोडमार्गे मकवाना सर्कलवर उजवे वळण घेऊन मकवाना रोड छेदीत अंधेरी कुर्ला रोडकडे वळविण्यात आली आहे. मकवाना रोड छेदीत अंधेरी कुर्ला रोड या ठिकाणी अंधेरी कुर्ला रोडकडून मकवाना रोडवर येणाºया वाहनांना बंदी आहे. मरोळ मरोशी रोड, लोकभारती रोड, मकवाना रोड, सागबाग रोड, मिलिटरी रोड, तसेच एल.जे. रोड या रस्त्यावर गाड्यांना मज्जाव (नो पार्किंग) आहे.मापखाननगर रोड व मरोळ व्हिलेज रोडवरील वाहनांना मरोळ नाक्याकडे येण्यासाठी उजवे वळण देण्यात आलेले नाही, तर सदरच्या वाहनांना मरोळ मरोशी रोडला डावे वळण घेऊन लोकभारती जंक्शन येथे उजवे वळण घेऊन लोकभारती रोडमार्गे मकवाना रोड जंक्शनवर उजवे वळण घेऊन मकवाना रोडमार्गे अंधेरी कुर्ला रोडकडे वाहतूक वळविण्यात आली आहे. ही वाहतूक व्यवस्था ५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे.संत ज्ञानेश्वर मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे मेट्रो मार्ग ३ प्रकल्पाचे काम बीकेसी स्थानक फर्स्ट स्टेज, सेंकड फेजमध्ये युटिलिटी डायव्हर्जन व सिंकेट पायलिंगचे काम १३ नोव्हेंबर रोजी सुरू झाले आहे. परिणामी, वाहतुकीमधील अडथळे, धोके लक्षात घेता, येथेही वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.मेट्रो मार्ग ३ प्रकल्पाचे बीकेसी स्थानकाचे फर्स्ट स्टेज, फर्स्ट फेज व फर्स्ट स्टेज, सेंकड फेजमध्ये युटिलिटी डायव्हर्जन व सिंकेट पायलिंगचे काम संत ज्ञानेश्वर मार्ग, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे मुंबई बँक यश श्री बिल्डिंगकडून इन्कमटॅक्स कार्यालय जंक्शनकडे जाणाºया मार्गावर म्हणजेच, दक्षिण वाहिनीवर साधारण पाच महिने होणार आहे. हा मार्ग १३ नोव्हेंबर २०१७ ते २५ मार्च २०१८ असे पाच महिने वाहतुकीस बंद आहे.ही दक्षिण वाहिनी बॅरिकेडिंग लावून बंद झाल्याने, संत ज्ञानेश्वर मार्गावरील वाहतूक सकाळी ७ ते दुपारी २ वाजेदरम्यान मुंबै बँक यश श्री बिल्डिंग ते इन्कम टॅक्स जंक्शन दोन मार्गिकांमध्ये उत्तर वाहिनीवर सुरू आहे. इन्कम टॅक्स जंक्शन ते मुंबै बँक, यशश्री बिल्डिंग एक मार्गिकेमध्ये वाहतूक सुरू आहे. दुपारी २ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान इन्कम टॅक्स जंक्शन ते मुंबई बँक, यशश्री बिल्डिंग दोन मार्गिकामध्ये वाहतूक सुरू आहे. मुंबै बँक, यशश्री बिल्डिंग ते इन्कम टॅक्स जंक्शन दोन मार्गिकांमध्ये उत्तर वाहिनीवर वाहतूक सुरू आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो