Join us
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर वाहतूककोंडीची समस्या

By admin | Updated: May 2, 2017 03:19 IST

रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक सुट्यांमध्ये पर्यटनासाठी येतात, तसेच सर्वत्र सुरू असलेली लग्न सराई यामुळे

रोहा : रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक सुट्यांमध्ये पर्यटनासाठी येतात, तसेच सर्वत्र सुरू असलेली लग्न सराई यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी वाहनांच्या संख्येत एकाकी वाढ झाल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होत आहे.२९ व ३० एप्रिल रोजी विवाहाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन्ही दिवशी ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. तर मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विवाहाचे मुहूर्त मोठ्या प्रमाणावर असल्याने एकाच दिवशी अनेक ठिकाणी विवाहाचे सोहळे दृष्टीस पडत आहेत. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी विवाहाचे मुहूर्त फार कमी होते. तर एप्रिल महिन्याच्या शेवटी व मे महिन्याच्या प्रारंभी मोठ्या प्रमाणावर मुहूर्त असल्याने व वार्षिक परीक्षा संपल्याने शाळा-कॉलेजना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे. लग्न सोहळे व प्रवासाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. पणजी-गोवा व तळकोकणातील महत्त्वाची पर्यटन स्थळे पाहण्यासाठी ठाणे, मुंबई व नवी मुंबई येथून दरवर्षी मे महिन्यात मोठ्या संख्येने प्रवास करणारे प्रवासी दृष्टीस पडतात. या वर्षीही तीच परिस्थिती पाहावयास मिळत असल्याने त्याचा फटका मात्र वाहतूककोंडीला बसत आहे. त्यातच महामार्गावर काही ठिकाणी सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम, महामार्गावरून मार्गक्र मण करणारी अवजड वाहने, वेडी-वाकडी वळणे, चढ-उतार व महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी असलेली माणसांची व वाहनांची गर्दी आदीमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यानेही वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडत आहे. महामार्गावर दिवसातून काही ठरावीक कालावधीनंतर होणारी वाहतूककोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होताना दिसत आहे. (वार्ताहर)