Join us  

वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात ‘स्पोर्ट्स बाइक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 7:18 AM

चेन स्नॅचिंग प्रकरणांना आळा घालण्यासह अपघातस्थळावर त्वरित पोहोचण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात लवकरच स्पोर्ट्स बाइकचा समावेश करण्यात येणार आहे.

मुंबई : चेन स्नॅचिंग प्रकरणांना आळा घालण्यासह अपघातस्थळावर त्वरित पोहोचण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात लवकरच स्पोर्ट्स बाइकचा समावेश करण्यात येणार आहे. विदेशातील नामांकित कंपन्यांच्या स्पोटर््स बाइकची चाचणी बुधवारी ताडदेव पोलीस स्टेशन ते मरिन लाइन्स या पट्ट्यात पार पडली. यामुळे लवकरच महागड्या स्पोटर््स बाइकवरून मुंबई वाहतूक पोलीस गस्त घालताना दिसणार आहे.मुंबईतील वाहतूक पोलिसांना हायटेक बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यात स्पोटर््स बाइकचादेखील समावेश आहे. बुधवारी ताडदेव पोलीस स्टेशन ते मरिन लाइन्स या मार्गावर चाचणी पार पडली. चाचणीसाठी मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस आणि व्हीआयपी सेवेत असलेल्या पोलिसांची निवड करण्यात आल्याची माहिती मोटार परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.विदेशी ५ खासगी कंपन्यांच्या सुमारे ५०० ते ७५० सीसी बाइकची चाचणी पार पडली. या वेळी रायडरला आरामदायी आसने, गेअर टाकताना येणारा अनुभव, वाहतूक कोंडीतून स्पोटर््स बाइक चालविताना येणारे अनुभव अशा विविध मुद्द्यांवर आधारित वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत ही चाचणी पार पडली. चाचणीनुसार अहवाल वरिष्ठांकडे सोपविण्यात येणार असून, प्रत्यक्षात कधी धावतील, याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्याचे एका रायडरने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले.प्रत्यक्षात कधी स्पोर्ट्स बाइक येणार? किती येणार? याबाबत माहितीसाठी वाहतूक नियंत्रण विभागाचे सहआयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.अपघातस्थळी वाहतूक पोलिसाला तत्काळ पोहोचता यावे, म्हणून वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक दुचाकी वाहन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुंबई पोलिसांतील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :वाहतूक पोलीसमुंबई