Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रुग्णालयाजवळील वाहतूककोंडी फुटणार

By admin | Updated: June 17, 2015 00:04 IST

वाहतूक पोलिसांच्या वाशी शाखेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे मनपाच्या वाशी रुग्णालयाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे.

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांच्या वाशी शाखेने केलेल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे मनपाच्या वाशी रुग्णालयाजवळ होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे. रुग्णालयाच्या शेजारी असणाऱ्या सेंट मेरी शाळेच्या व्यवस्थापनाने स्कूल बसेसना समोरील प्रवेशद्वाराऐवजी मागच्या बाजूने प्रवेश देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीला आळा बसेल, असा विश्वास वाहतूक विभागाच्या वाशी शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी व्यक्त केला आहे. मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयात दिवसभर शेकडो रुग्ण उपचारांसाठी येतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. विशेष म्हणजे याच रस्त्यावर रुग्णालय प्रवेशद्वाराच्या अगदी समोर रिक्षा स्टॅण्ड आहे. तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दुचाकी आणि खासगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेला हा रस्ता आणखी अरुंद झाला आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागते. विशेषत: रुग्णवाहिकेलाही अडथळा शर्यत पार करावी लागते. त्याचप्रमाणे याच मार्गावर रुग्णालयाच्या शेजारी सेंट मेरीज मल्टिपर्पज स्कूल आहे. तर त्याच्या पुढे फादर अ‍ॅग्नेल शाळा, साईनाथ हिंदी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि अंजुमन इस्लाम स्कूल आहे. त्यामुळे या मार्गावर विद्यार्थी व पालकांची मोठी वर्दळ असते. स्कूल बसेस, विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी खासगी वाहने आदींचा या मार्गावर नेहमीच वावर असतो. परिणामी, या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावर तोडगा काढण्यासाठी वाहतूक शाखेने मागील काही महिन्यांपासून प्रयत्न चालविले होते. उपमहापौर अविनाश लाड यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत सेंट मेरीज स्कूलचे व्यवस्थापन व वाहतूक पोलिसांबरोबर बैठक घेऊन परस्पर समन्वयाने तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार स्कूल बसेस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना शाळेच्या मागील बाजूने प्रवेश देण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे. त्यासाठी शाळेच्या मागील बाजूने स्वतंत्र रस्ताही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या अगदी समोरच होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)