Join us

ट्रॅफिकजॅम,पाणीटंचाई कायम

By admin | Updated: February 22, 2015 22:37 IST

प्रभाग क्र. ७० हा शहरी भागात असून गेल्या २० वर्षात या प्रभागामध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. वसईरोड रेल्वे स्थानक नजिक असल्यामुळे येथे लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला.

दीपक मोहिते, वसईप्रभाग क्र. ७० हा शहरी भागात असून गेल्या २० वर्षात या प्रभागामध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. वसईरोड रेल्वे स्थानक नजिक असल्यामुळे येथे लोकसंख्या वाढीला प्रचंड वेग आला. नगरपरीषद काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली, त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात या प्रभागामध्ये केवळ ८ ते १० कोटी रू. खर्च झाले. वसई शहरातील सर्वात गजबजलेल्या तसेच दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागालगत असलेल्या भागात रस्ता रूंदीकरण झाले परंतु माणिकपूर नाका परीसरात ते होऊ शकले नाही, त्यामुळे सकाळी व संध्याकाळी प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी होत असते. माणिकपुर नाका भागात चार रस्ते एकत्र येत असल्यामुळे येथे रस्तारूंदीकरण तसेच अनधिकृत फेरीवाल्यांना हटवणे आवश्यक आहे परंतु त्याकडे आजवर कधीच लक्ष दिले गेले नाही.प्रभागात अनेक विकासकामे मार्गी लागली असली तरी गेली अनेक वर्षे या प्रभागातील नागरीक पाणीटंचाईला कंटाळली आहे. उन्हाळ्यात तर रहिवाशांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत असते. दोन दिवस आड पाणी येत असल्यामुळे टँकरचे पाणी हाच एकमेव आधार असतो. मात्र त्याकरीता नागरीकांना चांगलीच पदरमोड करावी लागते. अनधिकृत बांधकामे मर्यादीत स्वरूपात आहेत. त्यामुळे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणावर ताण पडत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या या परीसराला अद्ययावत रूग्णालयाची नितांत गरज आहे, परंतु गेल्या साडेचार वर्षात त्यादृष्टीने कोणतीही पावले उचलली गेली नाहीत, त्यामुळे खाजगी रूग्णालयाकडून सर्वसामान्यजनांची लूट होत असते.या प्रभागातून निवडून येणारे संदेश जाधव हे गेली अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून येत असतात. नगरपरीषदेच्या काळात उपनगराध्यक्ष बांधकाम समिती सभापती व आता महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद अशा विविध पदावर त्यांनी काम केले. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र त्यांना आपल्या प्रभागातील वैद्यकीय सेवा, पाणीपुरवठा व वाहतूककोंडी तीन महत्वाचे प्रश्न सोडवण्यात यश मिळू शकले नाही.