ठाणे - वाहतुकीचे नियम वारंवार मोडणा-या वाहनचालकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने ट्रॅफिक ई-चलन दंडात्मक कारवाई शुक्रवारपासून ठाण्यात सुरू केली. ही कारवाई प्रायोगिक तत्त्वावर असली तरी यात वाहनाचे छायाचित्र, चालकाचा परवाना नंबर आदी बाबींची इत्थंभूत माहिती संगणकीकृत केली जाणार आहे. त्यामुळे वारंवार नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होईल. त्यामुळे सुरक्षित वाहने चालवून नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे़नवी मुंबईच्या धर्तीवर शहरात ई-चलन दंडात्मक कारवाईस ठाणे वाहतूक शाखेने प्रारंभ केला आहे. यासाठी सध्या तीन मशीन आहेत. अत्याधुनिक मशीनबरोबर प्रिंटरही असणार आहे. अत्याधुनिक मशीनद्वारे फोटो काढून माहितीही नोंदणीकृत करता येते. यामुळे वाहनचालकाने किती वेळा नियम मोडले, याची माहिती बसल्याजागी मिळणार आहे. जेवढे नियम मोडणार, तेवढी दंडाची मात्रा वाढणार आहे. तसेच त्याचा परवानाही रद्द करण्याबाबत आरटीओमध्ये प्रस्ताव वाहतूक शाखेकडून पाठविण्यात येणार आहे. सध्या ३ मशीन असल्या तरी ३५ मशीनची मागणी केली. एक युनिटकडे ३ मशीन असणे अपेक्षित असून सुरुवातीला ठाण्यात ही कारवाई होणार असून त्यानंतर अन्य शहरांत सुरू क रण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)
ठाण्यात ट्रॅफिक ई-चलन दंडात्मक कारवाईस सुरुवात
By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST