रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर दिवाळी सण व पर्यटन हंगामासाठी मुंबईकर कोकणाकडे वळले आहेत. त्यामुळे महामार्गावर पुन्हा एकदा वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत महामार्गाचा श्वास पुन्हा कोंडू लागला आहे.चार ते पाच दिवस जोडून आलेल्या सुटी, एस. टी.ने सोडलेल्या जादा गाड्या, खासगी वाहनांची वाढलेली संख्या आणि त्याच्या जोडीला अवजड वाहनांची होणारी वाहतूक यामुळे मुंबई -गोवा महामार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण आला आहे.सध्या मुंबई-गोवा महामार्गावर पेण शहर रामवाडी, वाशीनाका व हुडको कॉलनी परिसरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. प्रतिवर्षी याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्याच ठिकाणी ऐन दिवाळीत महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु असल्याचे भोगावती ब्रीज, उंबर्डे फाटा, वाशीनाका ते वडखळनाका या पाच किमीच्या अंतरावर मोठ्या प्रमाणावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. हे अंतर पार करण्यासाठी तब्बल अर्धा तासापेक्षा जास्त कालावधी लागतो. सकाळी ८ ते ११ व सायंकाळी ४ ते ८ या वेळेत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दिवाळीच्या सुटीत कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसह मुंबईकरही कोकणाकडे परतत असल्याने महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा ताण पोलीस यंत्रणेवर पडला आहे. महामार्गावरील खारपाडा ब्रीजपासून जितेपर्यंत, गोविर्ले ते बळवली, भोगावती ब्रीज ते पेण रेल्वे स्टेशन, कांदळे ते वडखळ, वडखळ ते डोलवी या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे कोकणाकडे येणाऱ्या एस. टी.च्या गाड्याही दोन ते तीन तास उशिराने येत आहेत. (प्रतिनिधी)
वाहतूक कोंडीची समस्या कायम
By admin | Updated: October 23, 2014 22:52 IST