मुंबई : पावसाळ्यानंतर बंद करण्यात आलेली चेंबूरमधील रस्त्यांची कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीसह धूळ आणि वाहनांच्या आवाजाने येथील रहिवाशी हैराण झाले आहेत. एमएमआरडीएने ही कामे तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. २००९ मध्ये चेंबूरच्या आर.सी. मार्गावरून मोनो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. यासाठी या मार्गावरील रस्त्यांच्या मधोमध पिलर उभे करण्यासाठी पत्रे लावून रस्ता अडवण्यात आला होता. त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली. २०१२पर्यंत या मार्गावर हे पत्रे असेच ठेवण्यात आले होते. त्यानंतर पिलर उभे झाल्यावर हे पत्रे काढण्यात आले. मात्र, मोनोचे काम सुरू असताना, मार्गावरील रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडत होती. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे रहिवाशांसह वाहनचालकदेखील हैराण झाले होते. खड्ड्यांमुळे वाहनांच्या देखभाल खर्चात वाढ होत होती. त्यामुळे या मार्गावरून माहुल गाव, वाशी नाका आणि गडकरी खाण या ठिकाणी जाण्यास रिक्षा आणि टॅक्सीचालक नकार देत होते. पर्यायाने रहिवाशांसमोर बेस्ट बस हा एकमेव पर्याय होता. मात्र, चेंबूर आणि कुर्ला रेल्वे स्थानकावरून माहुल किंवा वाशी नाका हे अंतर केवळ १५ ते २० मिनिटांचे असताना, या ठिकाणी पोहोचण्यास पाऊण ते एक तासांचा अवधी लागत होता. वाहतूक कोंडीचा हा त्रास काहीसा कमी व्हावा, यासाठी अनेक राजकीय पक्षांनी एमएमआरडीविरुद्ध आंदोलन केली.त्यानंतर गेल्या वर्षी एमएमआरडीएने या मार्गावरील सर्व रस्ते खोदून या ठिकाणी पुन्हा नव्याने रस्ते तयार केले. चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यापर्यंत नव्याने रस्ते पावसाळ्यापूर्वीच तयार झाले. वाशी नाका ते माहुल गावापर्यंतचे रस्ते पूर्वीसारखेच खराब होते. त्यामुळे हे रस्ते पुन्हा नव्याने तयार करण्याचे काम महिन्याभरापासून सुरू झाले आहे. परिणामी, सध्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका येथील कामगार आणि शाळकरी मुलांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. सकाळ आणि संध्याकाळी तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे एमएमआरडीने ही कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
चेंबूरमध्ये पुन्हा वाहतूक कोंडी
By admin | Updated: November 16, 2015 02:28 IST