Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना करमाफी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मार्च महिन्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. या काळात ठप्प ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी मार्च महिन्यात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. या काळात ठप्प झालेले व्यवहार अद्यापही पूर्णपणे सुरळीत झालेले नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या विविध विभागांकडून आकारल्या जाणाऱ्या करांतून माफी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी सेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेत त्यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. छोटे व्यापारी तसेच स्टॉलधारकांना दैनंदिन व्यापार करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचावे यासाठी आयुक्तांची भेट घेतल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. करमाफीसोबतच पालिकेच्या जागेतील स्टाॅलच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार सातत्याने होत असतात. मात्र, प्रशासन जुन्या परवानाधारकाच्या नावेच परवाने देते. त्यामुळे साध्या खरेदीखताच्या माध्यमातून व्यवहार होतात. यात पालिकेच्या तिजोरीत कोणताच महसूल येत नाही. त्यामुळे नवीन स्टाॅलधारकांकडून व्यवहारावर ठरावीक रक्कम आकारून त्यांच्याच नावे परवाने देण्यात यावेत. त्याने स्टाॅलधारकांना दिलासा मिळल, तसेच पालिकेलाही महसूल मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

याशिवाय, मुंबईतील नव्या आकाराच्या बस थांब्यांमुळे अनेक दुकानांचे दर्शनी भाग झाकले जात आहेत. दुकानाचा दर्शनी भाग ग्राहकांना दिसावा यासाठी बस थांब्यावरील मागील भाग जाहिरातींसाठी देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. या विविध मागण्यांबाबत आम्ही योग्य तोडगा काढू, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.