मुंबई : फोर जी टॉवरच्या वाढत्या विळख्याविरोधात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहेत. याविरोधात मुलुंडच्या म्हाडा कॉलनीतील रहिवाशांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. त्यात म्हाडा वसाहतीत उभारण्यात येत असलेल्या टॉवरला परवानगीच नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.मुलुंड, भांडुप, चेंबूर परिसरातील शाळा, मैदानाच्या आवारात उभे राहणाऱ्या फोर जी टॉवरविरोधात यापूर्वी निदर्शने, आंदोलने करण्यात आली होती. त्यापाठोपाठ म्हाडा वसाहतीतील गणेश बंगल्यासमोर थ्री जी टॉवर उभारण्यात आला होता. याविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून टॉवर हटविण्याबाबत सोसायटीचे रहिवासी पत्रव्यवहार करत आहेत. असे असताना या परिसरात नव्याने फोर जी टॉवर बसविण्यासाठी खोदकाम करण्यात येत आहे. मात्र नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे हे काम थांबविण्यात आले. त्यातही येथे उभारण्यात येत असलेल्या फोर जी टॉवरला परवानगीच नसल्याचे स्थानिकांनी मागविलेल्या माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रातून समोर आले आहे. यामध्ये महापालिकेच्या विशेष कक्ष उपप्रमुख अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा वसाहतीत फोर जी टॉवरबाबत कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. अद्याप या प्रकरणी कोणालाही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती कागदपत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मुलुंड म्हाडा कॉलनी असोसिएशनचे अध्यक्ष रवी नाईक यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ टॉवरला परवानगी नाहीच
By admin | Updated: July 29, 2015 03:33 IST