आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्यामुळे ख्रिसमस नाताळची सुटी असल्याने पर्यटकांची गर्दी सध्या मुरूड, काशीदच्या बीचवर झालेली आहे. आज मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांचे थवेच्या थवे दिसून आले. मुंबई - पुणे, ठाणे व इतर शहरातून आणि जिल्ह्याच्या विविध भागांतून कुटुंबासह मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. मुरुड तालुक्यातील काशीद बीच, दत्त मंदिर, गारंबी, जंजिरा किल्ला, ईदगाह हा परिसर आल्हाददायक, शांत रमणीय असा आहे. हा भाग मुंबईपासून २०० किमी आत असल्याने पर्यटकांची या परिसराला सध्या पसंती लाभत आहे.मुरुडचा प्रसिध्द जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची विशेष गर्दी सध्या इथे दिसत आहे. एकांतपणा, निवांतपणा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूवर फेसाळणाऱ्या सागरी लाटांचा किनारा मन मोहवून टाकतो. मुरुडला निसर्गाने सुंदर अशी रमणीयता बहाल केली असल्याने ही ऐतिहासिकता, भावत असल्याने याठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी होते. (वार्ताहर)
काशीद बीचवर पर्यटकांचे थवे!
By admin | Updated: December 25, 2014 22:11 IST