Join us  

गोरेगावमधील निसर्गाचा आविष्कार असलेला शुभ्र खळखळून वाहणारा धबधबा ठरतो पर्यटकांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 9:40 PM

गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा 1 व 2 समोरील डोंगरातील हिरवळ व पावसाळ्यात दिमाखात धो धो वाहणारा उपनगरातील एकमेव धबधबा तो देखील मुंबईत आहे, हे ऐकून तर मुंबईकर व पर्यटक आश्चर्य व्यक्त करतात.

- मनोहर कुंभेजकरमुंबई- गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा 1 व 2 समोरील डोंगरातील हिरवळ व पावसाळ्यात दिमाखात धो धो वाहणारा उपनगरातील एकमेव धबधबा तो देखील मुंबईत आहे, हे ऐकून तर मुंबईकर व पर्यटक आश्चर्य व्यक्त करतात. गोरेगाव पूर्व रेल्वे स्थानकावरून 346 व 646 बसने नागरी निवारा 1 व 2 च्या शेवटच्या थांब्यावर उतरल्यावर समोर व म्हाडाच्या अथर्व इमारतीच्या मागील बाजूस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर उगम पावणाऱ्या वलभट नदीतून दरवर्षी पावसात हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरतो.दर शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी या धबधबचा आनंद लुटण्यासाठी डोंगर चढून पर्यटक येथे गर्दी करतात. त्यातच गेले दोन चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तर हा धबधबा ओसंडून वेगाने वाहत आहे. त्यातच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत पडत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे काल व आज शाळा व महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केल्यामुळे गोरेगावसह पश्चिम उपनगरातील विद्यार्थ्यांनी या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आणि येथील धबधबा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विकासकाने येथे बांधकाम करून चक्क इन्फिनिटी आयटी पार्क डोंगरावरच उभारल्यामुळे येथील 30 ते 40 टक्के हा निसर्गाचा आविष्कार असलेला डोंगर आणि धबधबा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची खंत साद प्रतिसाद या संस्थेचे संस्थापक व पर्यावरण प्रेमी संदीप सावंत यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. हा धबधबा वाचावण्यासाठी पर्यावरण प्रेमी व मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन साद प्रतिसाद या संस्थेने केले आहे.निसर्गरम्य परिसर म्हणजे मिनी महाबळेश्वर होते. खळखळणारा धबधबा आणि वृक्षवल्लीने नटलेली हिरवाई. दरवर्षी डिसेंबर ते मे महिन्यात येथील विकासकातर्फे वृक्षांवर घाला घालून संपूर्ण डोंगरमाळात आग लावून डोंगर बेचिराख केला जातो. सर्वत्र काजळी पसरून डोंगरमाळ काळाकुट्ट होऊन जातो. डोंगरमाळात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर अनधिकृतपणे उत्खनन झालेले आहे ते खालून दिसत नाही ते वर डोंगरमाळाच्या माथ्यावर दिसते. त्याच बरोबर काँक्रिटच्या मुंबईचे दर्शन होते. पण पावसाच्या आगमनाने येथील निसर्ग पुन्हा बहरतो. राखेने काळाकुट्ट झालेला डोंगरमाळ पुन्हा हिरव्या गालिचाने बहरतो. पण आज काय स्थिती कोण लक्ष्य देणार याकडे, निसर्गाचा ऱ्हास कोण थांबणार, मुंबईकर याकडे लक्ष्य केव्हा देणार असा सवाल साद प्रतिसादच्या वतीने संदीप सावंत यांनी केला आहे. गोरेगावमधील नागरी निवारा परिषद आणि म्हाडा वसाहती मागील नॅशनल पार्कचा डोंगरातील वन्यजीवन, वृक्षवल्ली, औषधी वनस्पती नामशेष होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.वलभट नदी उगम पावते तो थील निसर्गरम्य परिसरना विकास क्षेत्र व संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात येतो. तरी तेथील वृक्ष संपदा जाणीवपूर्वक नष्ट होत असून, येथे मोठ्या प्रमाणात उत्खनन झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील नागरी वस्तीजवळ असलेला हा निसर्गाचा आविष्कार असलेला धबधबा वाचवायला हवा. याकरिता पर्यावरण संवर्धनावर काम करणारे संदीप सावंत युवा स्वराज्य व साद प्रतिसाद संस्थेचे यांनी येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर आणि येथील धबधबा यांच्या संवर्धन व संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन साद प्रतिसाद या स्वयंसेवी संस्थेने केले आहे. अधिक माहितीसाठी ९८२१३०८४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.