Join us

राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत एकूण ६६ पक्षांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये एकूण ६६ मरतूक आढळलेले असून, त्यापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत कुक्कुट पक्षांमध्ये एकूण ६६ मरतूक आढळलेले असून, त्यापैकी ६५ केवळ एका जळगाव जिल्ह्यातील आहेत. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य इतर पक्षांची आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली नाही. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत.

कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने होकारार्थी आल्यानुसार, सदर क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम,२००९ अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लूसाठी होकारार्थी आढळून आलेल्या, पोल्ट्री फार्मपासून १ किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया करण्यात येते. आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून ७ कोटी १२,१७२ कुक्कुट पक्षी) २६,०३,७२८ अंडी व ७२,९७४ किलो खाद्य नष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी याप्रमाणे नष्ट करण्यात आलेल्या अंडी, खाद्य व पक्ष्यांच्या मालकांना देण्यासाठी एकूण ३३८.१३ लक्ष निधी वितरीत केला आहे. बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने, प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक झालेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित स्थानिक प्रशासनाकडून केले जात आहेत.

या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षीधारकांनी जैवसुरक्षा उपाययोजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षीविक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवा व गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.