Join us  

सहाव्या मजल्यावरून पडल्याने फुटले कासवाचे कवच; प्राण्यांची काळजी न घेतल्यास ठरतो गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 1:37 AM

मुंबई : दहिसर येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने कासवाचे कवच फुटल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर त्या ...

मुंबई : दहिसर येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली पडल्याने कासवाचे कवच फुटल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर त्या कासवाला डॉ. मनीष पिंगळे यांच्या क्लिनिकमध्ये आणण्यात आले. डाॅक्टरांनी त्याच्यावर उपचार करून कवचाला प्लास्टर केले. 

तीन महिन्यांनी त्याचे कवच व्यवस्थित झाले आहे. त्याला पूर्णपणे बरे होण्यास आणखी काही दिवस लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या प्रमाणावर कासव पाळले जाते. श्रद्धा, अंधश्रद्धा, फेंगशुई अशा अनेक कारणांमुळे कासव पाळण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, कोणताच भारतीय जंगली प्राणी किंवा पक्षी पाळता येत नाही. तसे काही केल्यास संबंधितावर कारवाई होऊ शकते. 

डॉ. पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार परदेशी पक्षी किंवा प्राणी पाळण्याची परवानगी आहे. हे प्राणी पाळल्यानंतर त्याची नोंद सरकारच्या संकेतस्थळावर होणे गरजेचे आहे. शिवाय, आपण जे प्राणी पाळले आहेत, त्या-त्या प्राण्यांची, पक्ष्यांची काळजी आपण व्यवस्थित घेतली पाहिजे. अनेक वेळा त्यांची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही.  त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा एखादा प्राणी किंवा पक्षी विकत घेतला जातो, तेव्हा अनेकदा संबंधित ग्राहकाला फसविले जाते किंवा त्याची फसवणूक केली जाते. आपण विकत घेतलेला प्राणी किंवा पक्षी हा भारतीय नसून तो परदेशी आहे, असे भासविले जाते. प्रत्यक्षात मात्र ताे भारतीय असतो.  अशा प्रकरणात तक्रार दाखल झाली, तर संबंधितावर कारवाईचा बडगा उगारला जातो.

अनेक वेळा आणि अनेकांच्या घरांत मोठ्या प्रमाणावर कासव पाळले जातात. काही कासव शाकाहारी, तर काही मांसाहारी असतात. आपल्याकडे पाळल्या जाणाऱ्या कासवांना पुरेसे खाद्य दिले जात नाही. त्यामुळे ते कुपोषित राहते. पोषक खाद्य न मिळाल्याने त्याचे कवच अत्यंत नरम राहते. ते कठीण असणे गरजेचे असते, असे डाॅ. पिंगळे यांनी नमूद केले.

टॅग्स :मुंबई