Join us

गोराईची तरबोट सेवाही महागली

By admin | Updated: March 24, 2015 00:54 IST

बेस्ट आणि मेट्रो भाडेवाढ, रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट डबल झाल्यानंतर आता तरबोट सेवाही महागणार आहे़

मुंबई : बेस्ट आणि मेट्रो भाडेवाढ, रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट डबल झाल्यानंतर आता तरबोट सेवाही महागणार आहे़ गोराईकरांसाठी वाहतुकीचा सोयीस्कर मार्ग ठरलेल्या तरबोट सेवेच्या तिकिटांमध्ये दर तीन वर्षांनंतर २० टक्के वाढ होणार आहे़ त्यानुसार पर्यटकांसाठी १० रुपये, स्थानिक प्रवाशांना चार रुपये व वाहनांसाठी प्रत्येकी १० रुपये तिकीट आकारण्यात येणार आहे़ मात्र विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रवास विनामूल्य असणार आहे़बोरीवली जेट्टी ते गोराई जेट्टीदरम्यान असणाऱ्या खाडीवर पर्यटक, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी यांच्या प्रवासाकरिता तरबोट सेवा चालविण्यात येते़ मात्र कर्मचाऱ्यांचे वेतन, बोटीची देखभाल आणि इंधनाचा खर्च डोईजड होत असल्याने तिकिटाच्या दरात वाढ करण्याची परवानगी गोराई मच्छीमार सहकारी संस्थेने पालिकेकडून मागितली होती़ त्यानुसार पुढील सहा वर्षांमध्ये दर तीन वर्षांनी तिकीटदरामध्ये २० टक्के वाढ करण्यास पालिकेने अनुमती दिली आहे़ त्यानुसार या दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे़गोराई चौपाटीवर जाण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक या तरबोट सेवेचा लाभ घेतात़ या तरबोट सेवेने खाडी पार करणाऱ्या स्थानिक रहिवासी व विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे़ स्थानिकांना या सेवेसाठी आतापर्यंत दोन रुपये आकारण्यात येत होते़ हा तिकीटदर आता चार रुपये करण्यात येणार आहे़ तर पर्यटकांना पूर्वीपेक्षा दुप्पट म्हणजे १० रुपये तिकीटदर आकारण्यात येणार आहे़ स्वत:ची मोटारसायकल घेऊन येणारे पर्यटकही अधिक असल्याने त्यांना यासाठी अतिरिक्त १० रुपये मोजावे लागणार आहेत़ (प्रतिनिधी)पुढील तीन वर्षांनंतर प्रस्तावित दरच्प्रत्येक पर्यटकास १२ व त्यांच्या वाहनांचा तिकीटदर १२, स्थानिक प्रवाशांना पाच रुपये, तर वाहनांचे दर १२ रुपये़ विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा तीन वर्षांनंतरही विनामूल्य राहील़ मात्र तरबोटीतून वाहन नेण्यासाठी प्रत्येकी १२ रुपये त्यांना मोजावे लागतील़