Join us

तानियाची अव्वल स्थानी झेप

By admin | Updated: July 9, 2015 01:45 IST

अव्वल मानांकित इंटरनॅशनल मास्टर तानिया सचदेवने तामिळनाडूच्या फिडे मास्टर वैशाली आर.चा पराभव करत ४२व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ८व्या फेरीत अपेक्षित विजयासह विजयी कूच केली.

मुंबई : अव्वल मानांकित इंटरनॅशनल मास्टर तानिया सचदेवने तामिळनाडूच्या फिडे मास्टर वैशाली आर.चा पराभव करत ४२व्या राष्ट्रीय महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ८व्या फेरीत अपेक्षित विजयासह विजयी कूच केली. या विजयासह तानियाने स्पर्धेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे गोव्याच्या ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने महाराष्ट्राच्या फिडेमास्टर ॠचा पुजारीला नमवले. भार्इंदर येथे आॅल इंडिया चेस फेडरेशनच्या मान्यतेने महाराष्ट्र चेस असोसिएशन आणि ठाणे डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या स्पर्धेत तानियाने सफेद मोहऱ्यांनी खेळताना बेन्को गॅम्बिट पद्धतीने ओपनिंग करताना आक्रमक खेळ केला. काही वेळ बचावात्मक चाली खेळल्यानंतर तानियाने वैशालीला दबावाखाली आणण्यास सुरुवात केली. १९व्या चालीमध्ये तिने थेट वैशालीच्या राजाच्या बाजूने हल्ला केला. या आक्रमणाच्या नादात तिच्याकडून काही चुकाही झाल्या. मात्र यावर मात करताना तिने वजिराच्या जोरावर सहज बाजी मारली.दुसऱ्या बाजूला गोव्याच्या भक्तीने एकतर्फी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राच्या ॠचाला नमवले. सफेद मोहऱ्यांनी खेळताना भक्तीने सुरुवातीपासूनच आक्रमक चाली खेळताना ॠचाला दबावाखाली ठेवले. पूर्णपणे नियंत्रण राखलेल्या सामन्यात भक्तीने अखेरपर्यंत ॠचाला पुनरागमनाची एकही संधी न देता सहज विजय नोंदवला. तर तामिळनाडूच्या इंटरनॅशनल मास्टर मिचेल कॅथरिना आणि गोव्याच्या इंटरनॅशनल मास्टर इवाना मारिया फर्ताडो यांच्यातील सामना २३ व्या चालीनंतर अनिर्णीत अवस्थेत सुटला. स्पर्धेच्या आठव्या फेरीनंतर तानिया आणि वैशाली यांनी प्रत्येकी ७ गुणांसह संयुक्तरीत्या अव्वल स्थानी कब्जा केला आहे. यानंतर ६.५ गुणांसह गोव्याच्या भक्ती कुलकर्णीने दुसऱ्या स्थानी झेप घेतली असून ग्रँडमास्टर सौम्या स्वामीनाथन आणि ग्रँडमास्टर स्वाती घाडे यांनी प्रत्येकी ६ गुणांनी संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. (क्रीडा प्रतिनिधी )