मुंबई : देशातील टूल्स उद्योगाची आर्थिक उलाढाल २०१६-१७ या आर्थिक वर्षात १४ हजार ६०० कोटी रुपयांवर होती. त्यात यंदा ११ टक्क्यांनी वाढ झाली असून २०२० सालापर्यंत ही उलाढाल २० हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता एका अहवालाच्या आधारे टूल अॅण्ड गेज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे. या वेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्पादकांशी संवाद साधला.असोसिएशनचे अध्यक्ष डी. के. शर्मा म्हणाले, प्रभू यांनी देशाच्या आयात-निर्यातीचा दर्जा वाढविण्यासाठी धोरणात्मक पुढाकाराचा एक भाग म्हणून, जीडीपीमध्ये विदेशी व्यापाराचे योगदान वाढविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच अशा प्रकारच्या प्रदर्शनाद्वारे देशाला उद्दिष्ट साधता येईल, असा विश्वास व्यक्त केला.उद्योगपती जमशेद एन. गोदरेज या प्रदर्शनाला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या वेळी गोदरेज म्हणाले की, इंजेक्शन मोल्डिंग आणि डाय कास्टिंग हा आॅटोमोटिव्ह उद्योग आणि रेफ्रिजरेटर्स, ओव्हन, हीटर्स यांसारख्या मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिकल उपकरणांशी संबंधित प्रत्येक उत्पादनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र प्रत्येक उत्पादनात वापरल्या जाणाºया या महत्त्वपूर्ण घटकांबद्दल अनेकांना माहिती नाही. याचा वापर प्रतिष्ठेच्या चंद्रयान आणि मंगलयान मिशनच्या निर्मितीमध्ये केला गेला होता. टूल उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञानाला देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतही चालना मिळावी, म्हणून ११ ते १४ एप्रिलदरम्यान गोरेगावमधील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये डाय आणि मोल्ड हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरवल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शर्मा यांनी दिली. या प्रदर्शनातून टूलिंग उद्योगाशी संबंधित सर्व व्यवसायासाठी एक उत्तम व्यासपीठ निर्माण केले जाईल. टूल्स व्यवसायाशी संबंधित बाजारपेठ, उत्पादने आणि सेवा हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असेल, असेही शर्मा म्हणाले.
टूल्स उद्योगात ११ टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 02:53 IST