Join us

टोल आंदोलनापासून मनसे दूरच

By admin | Updated: July 4, 2014 04:05 IST

महाराष्ट्रातील टोलनाक्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सायन- पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्याबद्दल गप्प का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे

वैभव गायकर, खारघरमहाराष्ट्रातील टोलनाक्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सायन- पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्याबद्दल गप्प का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना आदी सर्वच राजकीय पक्षांनी या टोलविरोधी भूमिका घेतली असून मनसेने याठिकाणी एक निदर्शन देखील केलेले नाही. या महामार्गासाठी एकूण बाराशे कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे . तसेच याठिकाणी होणारी टोल वसुली पुढील १४ वर्षे चालणार आहे. या टोलचा भुर्दंड पनवेल तालुक्यासह नवी मुंबईमधील नागरिकांवर पडणार असल्यामुळे स्थानिकांना या टोलप्रश्नी सूट मिळावी यासाठी निदर्शने केली जात आहेत. सत्ताधारी काँग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील टोलला विरोध दर्शवत वेळ पडल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील याठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून आपला विरोध दर्शविला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी देखील टोलनाक्यावर पाहणी करून टोलप्रश्नी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या पनवेलमधील कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सुनील तटकरेंची मंत्रालयात भेट घेऊन टोलसंदर्भात निवेदन दिले. तसेच शेकाप देखील या टोलप्रश्नी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी विरोध दर्शविल्यानंतरही मनसे गप्प का, ही चर्चा सर्वत्र रंगत आहे. राज्यात टोलप्रश्नी थैमान घालणाऱ्या व टोलफोड आंदोलनाची भूमिका मांडलेल्या मनसेची टोलप्रश्नी पीछेहाट झाली का अशी चर्चा सुरू झाली आहे.