Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरेच्या चाफाच्या आदिवासी पाड्यातील शौचालयांची झाली दैनावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 01:46 IST

मूलभूत सुविधांपासून वंचित; साधे दरवाजेही नाहीत

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांना मुबलक सुविधा असताना स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरदेखील गोरेगाव पूर्व आरे येथील २७ आदिवासी पाड्यांपैकी अनेक आदिवासी पाडे आजही वीज, पाणी, रस्ते व शौचालय आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. येथील आदिवासी बांधवांना आजही नरकयातना सहन कराव्या लागत आहेत.‘हर घर में शौचालय’ हा नारा कितपत सत्य आहे? येथील शौचालयांस दरवाजेच नाहीत. अशा परिस्थितीत महिला कशा सुरक्षित राहू शकतील, असा सवाल राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे यांनी केला आहे.या पाड्यापासून शौचालय एक किलोमीटर अंतरावर आहे. चहूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि त्यातच वाघाची आणि जंगली जनावरांची भीती आहे. अशा परिस्थितीत तेथील महिला भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. शौचालयाजवळील सहा सौरऊर्जा दिवेदेखील बंद आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री अशा ठिकाणी शौचालयास जाणे धोक्याचे झाले आहे. महिलांची नवीन शौचालयाची मागणी आहे, अशी माहिती सुनीता नागरे यांनी दिली.