पालघर: राज्यातील औद्योगिक धोरणाला चालना देण्याबरोबरच जिल्ह्यातील जलसाठ्याची उपलब्धता जाणून त्याला अनुरुप असे कृषी धोरण ठरविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली होणार आहे. मेक अॅन इंडिया इझी टू बिझिनेस या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगाला चालना देण्याच्या संकल्पनेच्या धर्तीवर मेक महाराष्ट्रा इझी टू बिझिनेस या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक १७ जाने. रोजी सह्याद्री अतिथी गृहावर आयोजित केली आहे. त्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. औद्योगिक धोरणाला चालना देण्याच्या दृष्टीने बिनशेती परवान्यांच्या पद्धतीत बदल करून ते अधिक पारदर्शक व गतीमान करणे, जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या भीषण समस्येबाबत उपाययोजना आखणे, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत उद्दीष्ट गाठणे इ. बाबत उद्याच्या बैठकीत आढावा घेण्यात येणार आहे. भूमीअभिलेख विभागाचे संगणकीकरण, इ फेरफार, दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानाअंतर्गत निवडलेल्या गावांचा प्रगतीस्तर तपासणे, जलसाठ्याची सद्यस्थिती, सिमेंट बंधारे, छोटे बंधारे या कामांचा आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
कृषी धोरण ठरवण्यासाठी आज बैठक
By admin | Updated: January 16, 2015 23:04 IST