अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या स्थायीसह सहा विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवडणूक २ जून रोजी दुपारी २ वाजता घेण्यात येणार आहे. या पदावर वर्णी लावण्यासाठी शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्षांसह राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी केली आहे. नगरपरिषदेत शिवसेनेने अपक्ष आणि राष्ट्रवादीचे समर्थन घेऊन सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदी शिवसेनेची वर्णी लागल्यावर आता सभापतीपदासाठी समर्थन देणाऱ्या नगरसेवकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पहिल्याच वर्षी आपल्या वाट्याला सभापतीपद यावे, यासाठी अपक्षांनी शिवसेनेच्या नेत्यांपुढे विनवणी सुरू केली आहे. बहुमत असतानाही शिवसेनेला समर्थन देऊन कोणते तरी पद आपल्या पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या राष्ट्रवादीनेही बांधकाम सभापतीपद आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेला समर्थन देणाऱ्या रेश्मा गुडेकर, जयश्री कांबळे, रागिणी पवार यांनी हे पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर सेनेचे बंडखोर म्हणून निवडून आलेले सुभाष साळुंखे यांनी शिवसेनेला समर्थन देऊन सभापतीपद आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. नव्या नगरसेवकांना सभापतीपदासाठी संधी मिळेल का, हे उद्याच स्पष्टहोईल.
सभापतीपदासाठी आज निवडणूक
By admin | Updated: June 1, 2015 22:31 IST