मुंबई : मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे निकालाच्या तीन डेडलाइन चुकविल्या आहेत. न्यायालयात दिलेली ३१ आॅगस्टची डेडलाइन तरी मुंबई विद्यापीठ पाळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेपर तपासणीसाठीचा ३१ आॅगस्ट शेवटचा दिवस उजाडूनही, अद्याप विद्यापीठाने ३७ निकाल जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे मुंबई विद्यापीठ एका दिवसांत ३७ निकाल जाहीर करण्याचा चमत्कार करणार का? याकडे लक्ष लागून राहिले आहे. मुंबई विद्यापीठाने निकाल जाहीर न केल्यास, विद्यार्थी संघटना सक्रिय होणार असून ‘मुंबई विद्यापीठ वाचवा’ मोहिमेला सुरुवात करणार आहेत.मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे मुंबई दिवसभर ठप्प झाली होती. अनेक जण बुधवारी घरी गेले, पण मुंबई विद्यापीठावर असलेल्या निकालाच्या तणावामुळे प्राध्यापकांनी दोन्ही दिवशी हजेरी लावली. मंगळवारीही कमी प्रमाणात हा होईना, पण उत्तरपत्रिकांची तपासणी झाली. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ आॅगस्टचा दिवस उजाडूनही विद्यापीठाला हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करायची आहे.परीक्षा संपून जवळपास साडेतीन महिने पूर्ण झाले असले, तरी अजूनही विद्यार्थ्यांच्या हाती निकाल पडलेले नाहीत. परीक्षा संपल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल लावण्याचा विद्यापीठाचा नियम विद्यापीठानेच मोडला. रविवारी डेडलाइन पाळण्यासाठी घाईघाईत टीवाय बीकॉमच्या ५व्या आणि ६व्या सत्राचे निकाल जाहीर केले, पण संकेतस्थळ बंद पडले. बुधवारीही ते सुरळीत चालू झाले नव्हते. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे लवकर निकाल लागतील हा कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांचा निर्णय फसला आहे.हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच३१ आॅगस्ट उजाडूनही विद्यापीठाला अद्याप ८४ हजार ८०९ उत्तरपत्रिकांची तपासणी करायची आहे. १७ लाख ५८ हजार ५५९ उत्तरपत्रिकांपैकी १६ लाख ७३ हजार ७१९ उत्तरपत्रिकांची तपासणी ३० आॅगस्टपर्यंत पूर्ण झाली होती. बुधवारी. ११२ प्राध्यापकांनी सांयकाळी ६ वाजेपर्यंत ५ हजार २६५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.
निकालाची आजची डेडलाइनही चुकणार? हजारो उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 03:51 IST