Join us

मुंबईत आज आकाश ढगाळ राहणार, हवामान खात्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:21 IST

मुंबई शहर आणि उपनगरावरील मळभ हटले असले तरी वातावरणात सातत्याने बदल होत असून, या बदलाचा परिणाम म्हणून रविवारी मुंबईवरील आकाश ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरावरील मळभ हटले असले तरी वातावरणात सातत्याने बदल होत असून, या बदलाचा परिणाम म्हणून रविवारी मुंबईवरील आकाश ढगाळ राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर दुसरीकडे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढउतार नोंदविण्यात येत असून, १८ ते २१ मार्चदरम्यान मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मुंबईवरील ढगाळ वातावरण हटल्याने मुंबईकरांना उन्हाचे चटके बसत असून, यात उत्तरोत्तर वाढच होणार आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, मागील २४ तासांत मराठवाड्यात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव येथे ३६.६ तर सर्वात कमी किमान तापमान वाशिम येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. कोकण-गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे.विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे तर उर्वरित भागात लक्षणीय घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढले. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.१८-१९ मार्च : मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.२० मार्च : मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.२१ मार्च : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे राहील.मुंबईतील आकाश रविवारी अंशत: ढगाळ राहील. कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३६, २२ अंशांच्या आसपास राहील.म्ुंबईचे आकाश सोमवारी निरभ्र राहील. कमाल, किमान तापमान अनुक्रमे ३५, २२ अंशांच्या आसपास राहील.

टॅग्स :मुंबई