Join us  

आज महाअभिवादन; लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 6:15 AM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाअभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महाअभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून अनुयायी मुंबईत दाखल झाले आहेत. दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करता यावे, म्हणून अनुयायींनी बुधवारपासूनच रीघ लावली आहे. गुरुवारी उत्तरोत्तर यात आणखी भर पडणार असून, येथे दाखल अनुयायींना आवश्यक सेवा सुविधा बेस्ट आणि महापालिकेने उपलब्ध करून दिल्या आहेत.मुंबईसह नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, बीड, परभणी, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, अहमदनगर अशा अनेक ठिकाणांहून अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल होत असून, दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तरेकडील काही राज्यांतील अनुयायीही बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत. दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंतच्या सर्वच रस्त्यांवर अनुयायींची गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वत्र बाबासाहेबांना वंदन करणारे, महाभिवादन करणारे फलक लावण्यात आले आहेत. चैत्यभूमीवर दाखल होत असलेले अनुयायी बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष करत आहेत.बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य आणि त्यांच्याशी निगडित साहित्य अनुयायांना विकत घेता यावे, म्हणून शिवाजी पार्क येथे अनेक स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. बाबासाहेबांच्या मूर्ती, फोटो, कीचेन, असे अनेक साहित्य येथे विक्रीस उपलब्ध आहे. बाबासाहेबांचे विचार पटवून देण्यासाठी तरुणांकडून पथनाट्य सादर केली जाणार आहेत.राजकीय पक्षांसह संघटना, संस्थांनी आपले स्टॉल्स शिवाजी पार्क येथे उभारले आहेत. याद्वारे बाबासाहेबांचे विचार समाजाला पटवून दिले जात आहेत. पुस्तकांचे स्टॉल्स हे येथील खास आकर्षण असून, बाबासाहेबांची छायाचित्रे विकत घेण्यावर अनुयायी भर देत आहेत. येथे दाखल अनुयायींना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून बेस्ट आणि महापालिकेने खबरदारी घेतलीआहे.दरम्यान, चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथेही अनुयायींसाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्या ७ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. येथे सुमारे १० हजार अनुयायींची व्यवस्था असून, आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधाही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.>अशी आहे अनुयायींसाठीची व्यवस्थादादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ, चैत्यभूमी व शिवाजी पार्क, दादर(पूर्व) स्वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष/माहिती कक्ष.राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक सुविधा.चैत्यभूमी प्रवेशद्वाराजवळ, सूर्यवंशी सभागृह येथे रुग्णवाहिकेसह आरोग्य सेवाचौपाटीवर सुरक्षा रक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरातव्यवस्था.मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.स्काउट गाइड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था.