Join us  

मुख्यमंत्र्यांना डावलून आज सागरी महामार्गाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 7:43 AM

उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती : मोदींच्या कार्यक्रमात डावलल्याचा सेनेकडून बदला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कल्याण मेट्रो प्रकल्प भूमिपूजन समारंभात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलल्याचा वचपा काढत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने रविवारी महत्त्वाकांक्षी सागरी महामार्गाचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते ठेवले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डावलण्यात आले आहे. दुसरीकडे, या महामार्गाचे काम आधीच सुरू झाले असल्याचे सांगत भाजपाने आता भूमिपूजनाच्या औचित्यावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

मरिन लाइन्स ते कांदिवली या २९ किमीच्या सागरी महामार्गाच्या भूमिपूजन समारंभाला उद्धव यांच्याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती असेल; पण मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्याची तसदी महापालिकेने घेतलेली नाही. प्रमुख पाहुण्यांमध्ये भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा सोडले तर भाजपाचे कुणीही नाही.कल्याणमध्ये मेट्रोचे श्रेय एकट्याने घेत भाजपाने शिवसेनेवर कुरघोडी केलेली असताना आता सागरी महामार्गाचे श्रेय स्वत:कडे घेत शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना ठेंगा दाखविला आहे. या महामार्गाची उभारणी मुंबई महापालिका करणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना एक पत्र देऊन रविवारी सागरी महामार्ग भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यास सांगितले होते. शनिवारी सकाळी घाईघाईने या समारंभाच्या पत्रिका छापण्यात आल्या. २ हजार १२६ कोटी रुपये खर्चाच्या या महामार्गाची उभारणी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) करणार आहे.भाजपाची टोलेबाजीसागरी महामार्गाचे काम आधीच सुरू झालेले असताना आता भूमिपूजनाची गरज काय? असा अप्रत्यक्ष टोला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी हाणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोंसह मुंबई भाजपाने एक जाहिरात सोशल मीडियात व्हायरल केली असून ‘होय... कोस्टल रोड... मुंबईचे स्वप्न आहे... कोस्टल रोडला तातडीने सर्व विभागांची परवानगी मिळाली, कामास प्रारंभ’ असे त्यात म्हटले आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी यासाठी परवानगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानत सागरी महामार्गाचे श्रेयही भाजपाने घेतले आहे. 

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीस