ठाणे : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष तसेच ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने सोमवारी अनंत चतुर्दशींच्या बाप्पांचे विसर्जन केले जाणार आहे. ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी (घरगूती) सुमारे ३५ हजार बाप्पांचे विधीवत विसर्जन होणार आहे. यंदाही बाप्पांच्या मिरवणूकीला शहर व जिल्हा पोलीसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून विसर्जन घाटांसह मुख्य रस्त्यांवर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांद्वारे मिरवणूकीतील बारीक-सारीक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या वाहतूक मार्गांवरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. चोख बंदोबस्तठाणे शहर पोलिस आयुक्तलयात दोन पोलीस उपायुक्त, ३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१ पोलिस निरीक्षक, २९ सहाय्यक पोलीस निरीक्षक- पोलिस उपनिरीक्षक, ८७९ पोलीस कर्मचारी (स्त्री-पुरुष) राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या (प्रत्येकी ६०) असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर मुख्य रस्त्यांवर सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचाही वॉच ठेवण्यात आला आहे.तसेच मंडळांच्या स्वंयसेवकांची फौजही लक्ष ठेवणार आहे. यंदा ध्वनीप्रदूषणावर विशेष भर दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.शहरात १०९ ठिकणी होणार विसर्जन ठाणे:- ठामपाने गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था केली होती. यामध्ये रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन नीळकंठ ग्रीन (टिकुजिनी वाडी)येथे कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. मासुंदा तलाव येथील दत्तघाट आणि आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावरही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. पारसिक रेतीबंदर आणि कोलशेत, कोपरी येथे विसर्जन महाघाट, मानपाडा, कळवा आणि मुंब्रा यांच्यासह कल्याण-डोंबिवली , भिवंडी आणि उल्हासनगर,अंबरनाथ -बदलापूर अशा १०९ ठिकाणी बाप्पांचे विधीवत विसर्जन होणार आहे.तर ठाणे ग्रामीण भागात ७० तर पालघरमध्ये १५३ ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे.
जिल्ह्यात आज ३५ हजार बाप्पांचे विसर्जन
By admin | Updated: September 8, 2014 01:54 IST