Join us

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून टीप्स

By admin | Updated: August 9, 2014 00:31 IST

कार्यकर्त्यांची बैठक : गटबाजी संपविण्याचे आवाहन

मिरज : मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. सत्त्वशीला चव्हाण यांनी आज (शुक्रवारी) मिरजेत काँग्रेसच्या इच्छुकांची बैठक घेऊन मिरजेत भाजपला पराभूत करण्याच्या सूचना दिल्या. इच्छुक कार्यकर्त्यांनी गटबाजी न करता काँग्रेसची उमेदवारी मिळेल त्याला निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी केले. मिरजेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने जोरदार स्पर्धा सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्यास इच्छुक बंडखोरीचा इशारा देत आहेत. या पार्श्वभूमीवर सौ. चव्हाण यांनी मिरज विश्रामगृहात काँग्रेसच्या इच्छुक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी टिप्स दिल्या. गत निवडणुकीत दंगलीमुळे काँग्रेसचा पराभव झाला होता; मात्र यावेळी भाजपच्या विजयाची पुनरावृत्ती होता कामा नये, असे त्यांनी बजावले. इच्छुकांची संख्या जास्त आहे, उमेदवारी एकालाच मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन उमेदवारीसाठी एकाचे नाव निश्चित करावे. गटबाजी करू नये. मी मिरजेचीच असल्याने मिरजेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करेन. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिल्यास त्याच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहून काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सौ. चव्हाण यांनी केले. यावेळी इच्छुकांनी काँग्रेसची उमेदवारी ज्याला मिळेल त्याच्यासोबत राहू, बंडखोरी करणार नाही, असे आश्वासन दिले. बैठकीस पृथ्वीराज पाटील, आनंदराव डावरे, अ‍ॅड. सी. आर. सांगलीकर, सिध्दार्थ जाधव, बाळासाहेब होनमोरे, बसवेश्वर सातपुते, दयाधन सोनवणे, प्रकाश कांबळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)