Join us  

बीएचा निकालही वेळेत, : १२३ निकाल लावण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 6:05 AM

मुंबई विद्यापीठाच्या मागच्या वर्षीच्या निकाल गोंधळानंतर या वर्षी विद्यापीठाला अखेर सूर गवसला आहे. उन्हाळी सत्रातील तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यात विद्यापीठाला यश आले आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या मागच्या वर्षीच्या निकाल गोंधळानंतर या वर्षी विद्यापीठाला अखेर सूर गवसला आहे. उन्हाळी सत्रातील तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल वेळेवर लावण्यात विद्यापीठाला यश आले आहे. मागच्या वर्षी जुलैअखेर केवळ एकच निकाल लावू शकलेल्या विद्यापीठाने यंदा बीए, बीकॉमसह आतापर्यंत अनेक पदवी परीक्षेचे १२३ निकाल जाहीर केले आहेत. सोबतच पुढच्या वर्षी हेच निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील, याची तयारी विद्यापीठाकडून आतापासूनच केली जात असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून मिळाली आहे.यंदा बीएचा निकाल ३७ दिवसांत, बीकॉमचा निकाल ३१ दिवसांत, बीएससीचा निकाल ३५ दिवसांत, बीएमएसचा निकाल ४२ दिवसांत, बी फार्मचा निकाल १४ दिवसांत लावण्यात मुंबई विद्यापीठाला यश आले आहे. अद्याप बीएमएम आणि इंजिनीअरिंगचा निकाल बाकी असून, हे निकालही लवकरच अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली.मुंबई विद्यापीठात पदवी शिक्षण घेऊन बाहेरील विद्यापीठांमध्ये किंवा परदेशांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे काही निकाल गोपनीय पद्धतीने जाहीर केले जातात. त्यांचे कामही जवळपास पूर्ण झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक अर्जुन घाटुळे यांनी दिली.मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल्याने व शिक्षकांनी वेळेत मूल्यांकन केल्यानेच, विविध निकाल वेळेत जाहीर करणे शक्य झाल्याची चर्चा विद्यापीठात आहे.टीवायबीएचा निकाल ७३.५९ %मुंबई विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील टीवायबीएचा निकाल जाहीर करण्यात आला असून, निकालाची टक्केवारी ७३.५९ % आहे. एकूण १७,१७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १०,६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाने दिली.९३,४२७ उत्तरपत्रिका, ५५०२ शिक्षकतृतीय वर्ष बीएच्या परीक्षेच्या ९३ हजार ४२७ उत्तरपत्रिका होत्या. बीएच्या निकालासाठी ५ हजार ५०२ शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासल्या, तर ६ हजार ८४७ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन केले. या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन व मॉडरेशन आॅनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाल्याची माहितीही घाटुळे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ