खोपोली : वाघ हा वन्यजैविक साखळीतील महत्त्वाचा दुवा असल्याने त्यांचे अस्तित्व टिकावे, यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाने ‘वाघ वाचवा’ हा राष्ट्रीय अजेंडा समजून या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हा, असे आवाहन सह्याद्रीच्या ‘वाघ वाचवा’ अभियानांतर्गत करण्यात आले. टीसीआरसीच्या युवा मावळ्यांनी मुंबई ते सातारा रॅली काढून तसा संदेशच नागरिकांना या वेळी दिला.टायगर कॉन्झर्वेशन अॅण्ड रिसर्च सेंटर आयोजित डेक्कन अॅडव्हेंचर : सह्याद्रीचा वाघ वाचवा अभियान मुंबई ते सातारा रॅलीस फ्लॅग आॅफ करताना नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांनी वाघ वाचविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. व्ही. ठाकूर, टीसीआरएसचे अध्यक्ष प्रसाद हिरे, अभियानाचे प्रमुख जगदीश होळकर आदी उपस्थित होते. बुधवारी मुंबईतील डॉ. बी. हिरे आर्किटेक्चरमध्ये झालेल्या सोहळ्यानंतर मुंबई, बांद्रा, चेंबूर, मानखुर्द, पामबीच रोड, उरण रोड, जेएनपीटीमार्गे टीसीआरसीच्या युवा मावळ्यांच्या मोटारसायकल रॅलीचे खोपोली शहरात आगमन झाले.शुक्रवारी खोपोलीत आयोजित कार्यक्रमात बोलताना मसूरकर म्हणाले की, देशात कधीकाळी हजारोंच्या संख्येने असलेल्या वाघांची संख्या अवघी १७०६ झाली आहे. वाघ वाचला तर जंगल, पर्यावरण वाचेल, असा सल्लाही यावेळी त्यांनी दिला. (वार्ताहर)
वाघांचे अस्तित्व टिकणे महत्त्वाचे
By admin | Updated: December 26, 2014 22:33 IST