मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरवासीयांना उन्हाचे चटके सहन करावे लागत असतानाच आता १ एप्रिलपासून तिकीट दरवाढीचे चटकेही सहन करावे लागणार आहेत. बेस्टचे तिकीट एक ते दहा रुपयांनी महाग होण्याबरोबरच रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दरही पाच रुपयांनी वाढणार आहेत. तर रेल्वेची सीव्हीएम कूपनही १ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असल्याने हा महिना प्रवाशांसाठी एकूणच डोकेदुखी ठरणारा आहे. स्थानकांवर आपले नातेवाईक किंवा मित्रांना सोडण्यासाठी येणाऱ्यांची संख्या ही अधिक असते. यामध्ये तर रॅली, उत्सव, जत्रा या काळात रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. एकूणच उत्पन्न जास्त मिळावे आणि स्थानकांवर असणारी गर्दीही आटोक्यात राहावी यासाठी प्लॅटफॉर्मचे तिकीट पाच रुपयांवरून दहा रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय १ एप्रिलपासून लागू केला जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निर्णयामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटातून मिळणारे उत्पन्न दुप्पट होणार आहे. रेल्वे प्रवाशांना हा फटका बसत असतानाच दुसरीकडे तिकिटांचा सहजसोप्पा पर्याय असणारी सीव्हीएम कूपन सेवाच बंद केली जात आहे. सीव्हीएम कूपन सेवेत होत असलेले गैरव्यवहार आणि जमाखर्च ठेवण्याची डोकेदुखी पाहता एप्रिलच्या एक तारखेपासून या कूपनची विक्री बंद केली जाणार आहे. त्यामुळे तिकीट खिडक्यांचा आधार घेतानाच एटीव्हीएम, जेटीबीएस व मोबाइल तिकीट सेवांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागेल. रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसत असतानाच बेस्ट प्रवाशांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. १ एप्रिलपासून किमान भाडे सातवरून आठ तर वातानुकूलित बसभाडे २५ वरून ३0 रुपये होणार आहे. बेस्टला अर्थसंकल्पात शंभर कोटींचा निधी जाहीर केल्यानंतर ही भाडेवाढ अटळ होती. (प्रतिनिधी)
उद्यापासून तिकीट दरवाढीचे चटके
By admin | Updated: March 31, 2015 01:47 IST