देवरुख : आंबे-काजू काढण्यासाठी गेलेल्या सात-आठ तरुणांना जंगलात साळींदर दिसला. त्याची शिकार करण्यासाठी ते त्याच्या मागे लागले. साळींदर एका गुहेत शिरला. त्याला पाहण्यासाठी म्हणून गुहेत गेलेल्या तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी-खांबेवाडी येथे घडला. त्यातील एकाने तर यंदाच दहावीची परीक्षा दिली आहे. पंकेश प्रकाश खापरे (वय १५), विकास भिवा मांडवकर (३०), विलास बाळू पाताडे (३५) (सर्व रा. असुर्डे-पाताडेवाडी) अशी या तिघांची नावे आहेत.भुयारामध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. गुरुवारी रात्री त्यांच्यावर असुर्डे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, असुर्डे-पाताडेवाडी येथील पंकेश खापरे, विकास मांडवकर, विलास पातडे यांच्यासह सात ते आठजण बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास भिरकोंड येथे आंबा, काजू काढण्यासाठी गेले होते.आंबे काढता काढता त्यांना तेथे साळिंदर दिसला. या साळिंंदरला मारण्यासाठी सर्वांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पाठलाग करत करत हे सर्वजण डिंगणी-खांबेवाडीपर्यंत पोहोचले. खांबेवाडी येथे साळिंदर एका भुयारामध्ये घुसले. त्याला मारण्याचा चंग या तरुणांनी बांधला. साळींदर बाहेर येईल म्हणून सर्वजण रात्रभर भुयाराबाहेर वाट पाहत होते. गुरुवारी पहाटेपर्यंत साळिंदर बाहेर न आल्याने या तरुणांनी भुयारामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पंकेश खापरे भुयारामध्ये घुसला. बराचवेळ पंकेश बाहेर न आल्याने विकास मांडवकर आत गेला. मात्र, तोही परत न आल्याने विलास पाताडे भुयारामध्ये शिरला. बराचवेळ तिघेही बाहेर न आल्याने अन्य तरुणांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी गावात जाऊन हा प्रकार ग्रामस्थांसमोर कथन केला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोध मोहीम सुरू केली. तसेच तत्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद देण्यात आली. या घटनेची दखल घेत संगमेश्वर पोलीस तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. ग्रामस्थांच्या मदतीने पंकज, विलास व विलास यांना भुयाराबाहेर काढून उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय सूत्रांनी तपासणी केली असता, या तिघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
असुर्डेतील तीन तरुणांचा गुदमरून मृत्यू
By admin | Updated: May 29, 2015 00:03 IST