Join us

तीन वर्षांपासून गायब व्यक्तीला आरपीएफने शोधले

By admin | Updated: June 28, 2017 03:39 IST

तीन वर्षांपूर्वी ताडदेव परिसरातून एक ४८ वर्षीय इसम अचानक गायब झाला होता. याबाबत ताडदेव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तीन वर्षांपूर्वी ताडदेव परिसरातून एक ४८ वर्षीय इसम अचानक गायब झाला होता. याबाबत ताडदेव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ताडदेव पोलिसांना तीन वर्षांत या इसमाचा शोध घेण्यात अपयश आले. अखेर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी या इसमाला ठाणे परिसरातून शोधून काढले आहे. महेंद्रप्रसाद यादव असे या इसमाचे नाव आहे. तो मूळचा बिहार येथे राहणारा आहे. २००६ साली कामाच्या शोधात तो मुंबईत आला होता. काही दिवस मिळेल ते काम केल्यानंतर काही वर्षे त्याने टॅक्सीही चालवली. मात्र २०१४ सालापासून तो अचानक गायब झाला. कुटुंबीयांशीदेखील काहीही संपर्क न झाल्याने त्यांनी याबाबत ताडदेव पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. मात्र पुढे काहीही कारवाई झाली नाही. महेंद्रप्रसादच्या एका नातेवाइकाने ही बाब घाटकोपर रेल्वे स्थानकातील ब्रिजेशकुमार या आरपीएफ अधिकाऱ्याला सांगितली. त्यांनी तत्काळ या गरीब कुटुंबीयांची अडचण लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केली. काही दिवसांत महेंद्रकुमार हा ठाणे परिसरातील एका इसमाकडे काम करत असल्याची माहिती ब्रिजेशकुमार यांना मिळाली. त्यांनी तत्काळ या इसमाच्या कुटुंबीयांना ही बाब सांगितली. त्यानुसार मुंबईत दाखल झाल्यानंतर महेंद्रकुमार याला ठाणे येथून ताब्यात घेऊन आरपीएफने त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.