Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात चोरी करणारे तिघे अटकेत

By admin | Updated: August 24, 2015 01:01 IST

रात्रीच्या वेळी मंदिरांत शिरून दागिने आणि अन्य सामानाची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना शनिवारी शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन

मुंबई : रात्रीच्या वेळी मंदिरांत शिरून दागिने आणि अन्य सामानाची चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना शनिवारी शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन आरोपींचादेखील समावेश आहे, अशी माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली.गेल्या काही दिवसांपासून शिवाजी नगर परिसरात असलेल्या मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. मंदिरातून दागिने, पितळेच्या समई, दानपेटी आणि अन्य सामानाची मोठ्या प्रमाणात चोरी होत होती. गुरुवारी मध्यरात्री येथील राम मंदिर परिसरातदेखील चोरट्यांनी घुसून मंदिरातील दानपेटी आणि काही समया चोरल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ही बाब मंदिरातील पुजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी तत्काळ शिवाजी नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. या परिसरात राहणाऱ्या तीन सराईत आरोपींनीच ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अलियास शेख (२०) याच्यासह १६ आणि १४वर्षीय या दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली. या तिन्ही आरोपींवर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांत सात ते आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती शिवाजी नगर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)