मुंबई : एमयूटीपी-३ मधील तीन प्रकल्पांना एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये विरार ते डहाणू तीसरा-चौथा मार्ग, ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश असून, त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी सल्लागार समिती नेमण्यात येणार असून, त्याची निविदा ७ मे रोजी खुली होणार असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरांत सध्या एमयूटीपी-२अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्पांचे कामे सुरू आहे. यामध्ये डीसी-एसी परावर्तन, हार्बरवर १२ डब्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, अंधेरी ते गोरेगाव हार्बर मार्गाचे विस्तारीकरण या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचे काम सुरू असतानाच एमयूटीपी-३ मधील ११ हजार ४४१ कोटी रुपये किमतीच्या सात प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली. मंजुरी देण्यात आल्यानंतर यातील तीन प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय झाला. मात्र सातपैकी कोणत्या तीन प्रकल्पांना गती द्यायची, यावर एमआरव्हीसी अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली आणि त्यानंतर विरार ते डहाणू तीसरा-चौथा मार्ग, ऐरोली-कळवा लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. या प्रकल्पांचे एमआरव्हीसीकडून सर्वेक्षण केले जाणार असून, त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार असल्याचे एमआरव्हीसीतील सूत्रांनी सांगितले. या सर्वेक्षणानंतर त्याचा अहवालही तयार केला जाईल. एमआरव्हीसीकडून यासाठी २0 मार्चपासून निविदा काढण्यात आली आणि त्याची अंतिम मुदत ही ७ मे दुपारी तीनपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर याच दिवशी दुपारी साडेतीन वाजता निविदा खुली केली जाणार आहे. सल्लागार कंपनीची नियुक्ती केल्यानंतर येत्या सहा महिन्यांत या कंपनीने एमआरव्हीसीला अहवाल सादर करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. अन्य कामांचाही समावेशसर्वेक्षणात रेल्वे मार्गासह सिग्नल यंत्रणा, पूल, लागणारी जमीन आणि अन्य कामांचा समावेश आहे. विरार ते डहाणू तिसऱ्या-चौथ्या मार्गाच्या सर्व्हेसाठी १ कोटी ६५ लाख ९0 हजार रुपये, तर ऐरोली-कळवा लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरणाच्या अभ्यासासाठी १ कोटी १३ लाख २५ हजारांचा खर्च येणार आहे.विरार ते डहाणू चौपदरीकरण हा ६४ किलोमीटर, पनवेल ते कर्जत दुहेरी मार्ग हा २९ किलोमीटर आणि ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंक रोड हा तीन किलोमीटर एवढा आहे. पनवेल-कर्जत दुहेरीकरणाच्या प्रकल्पाची एकूण किंमत २ हजार २४ कोटी रुपये आहे. ऐरोली ते कळवा लिंक रोड (एलिव्हेटेड) प्रकल्पाची किंमत ४२८ कोटी आहे. विरार ते डहाणू तिसरा-चौथा मार्गाच्या प्रकल्पाची किंमत ३ हचार ५५५ कोटी रुपये आहे. विरार ते डहाणू तिसरा-चौथा मार्ग, ऐरोली-कळवा लिंक रोड व पनवेल-कर्जत दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेशएमयूटीपी-३ मधील सात प्रकल्पांची एकूण किंमत ११ हजार ४४१ कोटी रुपये एवढी आहे. यात पनवेल-कर्जत दुहेरीकरण, ऐरोली-कळवा लिंक रोड, विरार ते डहाणू तिसरा आणि चौथा मार्ग यांसह स्थानकांचा विकास, मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील दोन स्थानकांमधील रूळ ओलांडणे रोखण्यासाठी विविध योजना व तांत्रिक कामे तसेच नवीन डबे आणि लोकलची खरेदी अशा प्रकल्पांचा समावेश आहे.
एमयूटीपी-३चे तीन प्रकल्प ट्रॅकवर
By admin | Updated: May 6, 2015 04:19 IST