Join us

जळगावकरांना गंडा घालणारे तिघे अटकेत

By admin | Updated: December 18, 2015 02:18 IST

आखाती देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जळगावकरांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पायधुनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अरुम नवाब शेख, वाहिद मोहम्मद शेख,

मुंबई : आखाती देशांमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने जळगावकरांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पायधुनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अरुम नवाब शेख, वाहिद मोहम्मद शेख, साजीद अब्दुल वाजीर शेख अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून ३० बनावट व्हिसा, पासपोर्ट हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील एक म्होरक्या दाऊद देशपांडे जळगावातील तरुणांना कतार येथील सी शोर हॉनेस्टी या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत होता. विदेशात जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसा यासाठी प्रत्येकी ३० ते ४० हजार तो उकळत असे. त्या बदल्यात बनावट व्हिसा आणि कंपनीच्या कराराची झेरॉक्स कॉपी या तरुणांना देत असे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे मुंबईतील पायधुनी येथील भंडारी इस्टेट परिसरातील ‘आॅल सफर इंटरनॅशनल’ या टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलमध्ये या तरुणांना पाठवत असे. त्याला या कामाचे प्रत्येकी ५ हजार रुपये मिळत होते. अशा प्रकारे त्याने तब्बल ६० ते ७० जळगावकरांना या टोळीच्या स्वाधीन केले आहे. मात्र पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याने बुधवारी सर्व तरुणांनी पायधुनी येथील आरोपींच्या टूर्स अ‍ॅण्ड टॅ्रव्हलच्या कार्यालयात धाव घेतली. त्यांचा या परिसरात गोंधळ सुरू असल्याची माहिती पायधुनी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, एपीआय बी. कानवडे, पीएसआय सुनील पवार यांचे तपास पथक तेथे दाखल झाले. तिघांनाही पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी मुंब्रा आणि अ‍ॅण्टॉप हिल परिसरात भाडेतत्त्वावर राहतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या या कारवाया सुरू असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)