Join us  

गोरेगाव येथे आगीत तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 4:35 AM

गोरेगाव (प) स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘टेक्निक प्लस’ या ९ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले.

मुंबई - गोरेगाव (प) स्वामी विवेकानंद मार्गावरील ‘टेक्निक प्लस’ या ९ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू झाला, तर ९ जण जखमी झाले. नईमुद्दीन शाह (२५), रामअवतार (४५), राम तिराठपाल (४५) अशी मृतांची नावे आहेत. आगीची तीव्रता लक्षात घेत अग्निशमन दलाने ‘लेव्हल ३’ हा कॉल दिला होता.दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास लागलेली ही आग सुमारे ७ तासानंतर रात्री ११ वाजता विझवण्यात यश आले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ही इमारत काचेची असून वीजेची वायरिंग कन्सिल्ड पध्दतीने करण्यात आली होती. बेसमेंटमधील इलेक्ट्रिक डक्टला आग लागली. त्यामुळे सर्व मजल्यावर धुर पसरला होता.अग्निशमन दलाचे अधिकारी सोनावणे व इतर ३ कर्मचाऱ्यांना आग विझवताना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने १०८ रूग्णवाहिकेमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले.अग्निशमन दलाचे अधिकारी रॉबिनसन्स सुवारीस (४८) यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले. तर शिवाजी मंदाडे (३२), श्रीराम नरहरे (३५) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर दलाचे जवान मारूती अराटे (२४), यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले.अत्यवस्थ अवस्थेत इमारतीत अडकलेल्या वसीम सलमानी यांच्यावर उपचार करून त्यांना सोडण्यात आले.

टॅग्स :आगमुंबई