Join us

वृद्धेच्या घरी घरफोडी करणाऱ्या तीन जणांना अटक

By admin | Updated: October 28, 2016 04:06 IST

चोरीला गेलेल्या फोनमुळे एका वृद्धेच्या घरी झालेल्या लाखोंच्या घरफोडीची उकल होण्यास मदत झाली. हा प्रकार दहिसर परिसरात सोमवारी घडला असून या प्रकरणी पोलिसांनी

मुंबई : चोरीला गेलेल्या फोनमुळे एका वृद्धेच्या घरी झालेल्या लाखोंच्या घरफोडीची उकल होण्यास मदत झाली. हा प्रकार दहिसर परिसरात सोमवारी घडला असून या प्रकरणी पोलिसांनी कर्नाटकमधून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर त्यांच्या अन्य दोन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे. मोहन सिंग, दर्शन देऊघा आणि संतोष राउल अशी या तिघांची नावे आहेत. दहिसर पूर्वेकडील शक्तीनगरच्या शुभम सोसायटीत कुसुम मौर्य (६२) या राहतात. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर रोजी त्या त्यांच्या मुलीकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. २४ सप्टेंबरला त्या घरी परतल्या. घरी आल्यावर घरातील सर्व साहित्य त्यांना विखुरलेले दिसले. त्यामुळे त्यांनी आत जाऊन कपाट उघडले असता त्यातील दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या मोबाइलने झाली उकलचोरीच्या साहित्यात मोबाइलचाही समावेश होता. चोरांनी तो मोबाइल जीवनसिंह थापा नामक इसमाला विकला. थापा याला हा चोरीचा मोबाइल आहे, याची माहिती नसल्याने त्याने तो या प्रकरणातील फरार आरोपी नेपाळे याच्याकडून विकत घेतला आणि नवीन सिमकार्ड टाकून सुरू केला. फोनचे लोकेशन शोधताना पोलिसांनी थापाला चौकशीसाठी बोलावले. चौकशीत नेपाळे व लोकबहादूरची नावे कळल्यावर पोलीस कर्नाटकात दाखल झाले. तेथून सिंग, देऊघा आणि राउल यांना ताब्यात घेण्यात आले. राउल आणि नेपाळेने नालासोपाऱ्यातील भगवतीलाल जैन सोनाराला चोरीचे दागिने विकले होते. नेपाळे याची आई आजारी असून त्याला पैशांची गरज असल्याचे या दोघांनी सोनाराला सांगितले. त्याने हे दागिने वितळवले होते. एक लाख साठ हजार रुपयांचे सोने त्याने परत केले.