Join us

महापालिकेची तीन नवीन रुग्णालये

By admin | Updated: April 27, 2015 04:33 IST

महापालिकेने नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली येथे उभारलेली तिन्ही रुग्णालये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा मानस आहे

नवी मुंबई : महापालिकेने नेरूळ, बेलापूर आणि ऐरोली येथे उभारलेली तिन्ही रुग्णालये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून नागरिकांसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. या रुग्णालयांमध्ये सध्या केवळ बाह्यरुग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन संपूर्ण सुविधांसह लवकरच ही तिन्ही रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.नवी मुंबईकरांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ऐरोली व नेरूळ येथे प्रत्येकी १०० खाटांची दोन तर बेलापूर येथे पन्नास खाटांचे एक अशी एकूण तीन रुग्णालये उभारली आहेत. नोव्हेंबरमध्ये या तिन्ही रुग्णालयांतील बाह्यरुग्ण सेवा विभागाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र महापालिका निवडणुका, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची कमतरता, वैद्यकीय साहित्यांचा अभाव यामुळे परिपूर्ण सेवा सुरू करण्यात आली नव्हती. परंतु आता प्रशासनाने त्यादृष्टीने कंबर कसली आहे. सीटी स्कॅन मशिनसह इतर साहित्य उपलब्ध करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या रुग्णालयासाठी ४० ते ४५ नवीन डॉक्टर्स आणि इतर स्टाफचीही तजवीज करण्यात आली आहे. एकूणच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सर्व सुविधांसह ही तिन्ही रुग्णालये खुली करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)