Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे भारत सहकारी बँकेच्या तीन नवीन शाखा

By admin | Updated: March 26, 2017 05:04 IST

ठाणे भारत सहकारी बँकेने गुरुवार, २३ मार्चला कुर्ला, पालघर आणि कर्जत येथे तीन नवीन शाखांचे लोकार्पण केले

मुंबई : ठाणे भारत सहकारी बँकेने गुरुवार, २३ मार्चला कुर्ला, पालघर आणि कर्जत येथे तीन नवीन शाखांचे लोकार्पण केले. अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी बँकेच्या ताफ्यात तीन नवीन शाखा सुरू झाल्याने आता बँकेच्या एकूण २७ शाखा कार्यरत झाल्या आहेत. आजघडीला बँकेची आर्थिक उलाढाल २ हजार १०० कोटींची आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता कुर्ला येथील शाखेचे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले यांच्या हस्ते करण्यात आले, तर बँकेचे उपाध्यक्ष उत्तम जोशी यांच्या हस्ते पालघर शाखेचे आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. रवींद्र रणदिवे यांच्या हस्ते कर्जत शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तीन शाखांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक यांनी उपस्थित ग्राहकांना आणि हितचिंतकांना बँकेच जास्तीत जास्त ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. ठेवी अधिक असल्यास बँकेला गरजू व्यक्तींना जास्तीत जास्त कर्ज पुरवठा करता येईल त्यामुळे बँकेचा ग्राहकही आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा बँकेचा उद्देश सफल होईल. कर्जदारांनीही बँकेकडून जास्तीत जास्त प्रमाणात कर्ज घेऊन वेळेत परतफेड करावी, असे आवाहन करण्यात आले.मा. य. गोखले यांनी सांगितले की, बँक अत्याधुनिक असल्याने तंत्रज्ञानाने सज्ज असून मोबाइल बँकिंग, ए.टी.एम, सी.डी.एम., कोअर बँकिंग, रुपे डेबिट कार्ड, एस.एम.एस.  अलर्ट, एन.ई.एफ.टी., परकीय  चलन, आर.टी.जी.एस., मुद्रांकन सेवा इत्यादी सेवा उपलब्ध आहेत. लवकरच नेट बँकिंग आणि यु.पी.आय. ही आधुनिक  तंत्रज्ञानाची आधुनिक सुविधाही देण्यात येणार आहे.  (वाणिज्य प्रतिनिधी)