नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या युनिट एकने तीन लाख रुपये किमतीच्या बनावट सीडी जप्त केल्या आहेत. तुर्भे जनता मार्केट येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.शहरात अनेक ठिकाणी बनावट (पायरेटेड) सीडी विक्रेत्यांनी उघडपणे दुकाने मांडली आहेत. मात्र स्थानिक पोलिसांच्या उदासीनतेमुळे अथवा त्यांच्याशी असलेल्या हितसंबंधांमुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी कॉपीराइट कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा बनावट सीडी विक्रेत्यांकडे मराठी, हिंदी, इंग्रजी अशा सर्वच भाषांतील नवनवीन चित्रपटांच्या सीडीज अथवा डीव्हीडी विक्रीसाठी उलब्ध असतात. त्यामुळे नव्यानेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या व्यवसायावर देखील दुष्परिणाम होत असतो.यासंदर्भात अनेक चित्रपटांचे व त्यांच्या गाण्यांचे अधिकार असलेल्या कंपनीने गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार युनिट एकचे पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या पथकाने तुर्भे जनता मार्केट येथे छापा टाकला. यावेळी तेथे पदपथावर सीडी विक्री करणाऱ्या सय्यद शकील हुसेन (२२) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एकूण ३ लाख २० हजार ९०० रुपये किमतीच्या बनावट सीडी, डीव्हीडी व एमपीथ्री जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनेक मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. हुसेन हा तुर्भे नाका येथील राहणारा असून, त्याच्यावर कॉपीराइट अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने मोठ्या प्रमाणात बनावट सीडी आणल्या कुठून याचाही तपास गुन्हे शाखा पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)
तीन लाखांच्या बनावट सीडी जप्त
By admin | Updated: May 18, 2015 05:14 IST