Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुरिअरचे गोदाम लुटणारे तिघे गजाआड

By admin | Updated: May 3, 2016 01:20 IST

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुरिअरच्या गोदामात घुसून जबर चोरी करणाऱ्या तीन आरोपींना मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हे तीनही आरोपी

मुंबई : लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुरिअरच्या गोदामात घुसून जबर चोरी करणाऱ्या तीन आरोपींना मालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांत २० ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.२५ एप्रिलला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना एल.टी. मार्गावरील कुरिअरच्या गोदामात घडली होती. आरोपींनी गोदामात प्रवेश करत या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याचे हात-पाय बांधले. त्यानंतर तेथे असलेले सर्व पार्सल चाकूने फोडून यामधील अनेक किमती वस्तू घेऊन आरोपींनी पोबारा केला. कर्मचाऱ्याने आपली सुटका करत ही माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. याच दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास मालमत्ता विभागाकडूनदेखील करण्यात येत होता. गोदामामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने तिन्ही आरोपींचे चेहरे त्यात कैद झाले होते. त्यानुसार मालमत्ता विभागाचे अधिकारीदेखील या आरोपींच्या शोधात होते. याच दरम्यान हे आरोपी भिवंडी परिसरात असल्याची माहिती मालमत्ता कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक दीप बने यांना मिळाली. त्यांनी तत्काळ भिवंडीमध्ये जाऊन सापळा रचत शेषनाथ उपाध्याय (५२), हैदरअल्ली शेख (४२) आणि बिपीनचंद्रा बिशाद (३१) या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी, लूट आणि दरोडा असे अनेक गुन्हे राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. पोलीस त्यांच्या साथीदारांचाही शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)