Join us

पूर बोगद्यांसाठी तीन आंतरराष्ट्रीय कंपन्या इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:33 IST

मुंबई : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी टोकियो शहराच्या धर्तीवर पूरबोगदे उभारण्याची तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. यापैकी नियुक्त केलेल्या ...

मुंबई : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी टोकियो शहराच्या धर्तीवर पूरबोगदे उभारण्याची तीन आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी तयारी दाखवली आहे. यापैकी नियुक्त केलेल्या कंपनीला या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून पूर बोगदा कसा उभारता येईल? याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. येत्या पाच वर्षांत हा प्रकल्प उभारून मुंबापुरीला दिलासा देण्याचे पालिकेचे लक्ष्य आहे.

दरवर्षी मुंबईतील सखल भाग पाण्याखाली जातात. हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षांत अनेक प्रयोग केले. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांनी तात्पुरता दिलासा दिला. मात्र गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे काही नवीन भागांमध्ये पाणी तुंबले. दक्षिण मुंबईत कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याचे दिसून आले. त्यामुळे टोकियो शहराच्या धर्तीवर पावसाचे पाणी भूमिगत टाकीत साठवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे स्वतः या प्रकल्पासाठी आग्रही आहेत.

यासाठी या प्रकल्पाकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिरुची स्वारस्य मागवण्यात आले होते. यामध्ये दक्षिण कोरिया, नेदरलँड, जपान येथील कंपन्यांनी इच्छुक असल्याचे कळवले आहे. या कंपन्यांची माहिती घेऊन फेब्रुवारी महिन्यात यापैकी एका कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करणाऱ्या सल्लागाराला मुंबईतील पावसाचा कल, शहराची भौगोलिक रचना आदींचा अभ्यास करावा लागणार आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर संबंधित कंपनीला पुढील चार वर्षांसाठी व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून या प्रकल्पावर काम करावे लागणार आहे. यासाठी महापालिका सुमारे ३१ कोटी रुपये मोजणार आहे.

* पूर बोगद्यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वीपासून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार पालिकेतील अधिकाऱ्यांचे पथक टोकियोतील पूर् बोगद्याचा अभ्यास करणार होते. तर तेथील तज्ञ मुंबईत येऊन या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणार होते. मात्र कोरोना काळात हा प्रकल्प लांबणीवर पडला.

* मुसळधार पावसात विहार, तुळशी आणि पवई या तलावातील जादा पाणी समुद्रात सोडून देण्याऐवजी भूमिगत टाक्यांमध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे.