Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन टोळ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:06 IST

कुर्ला, धारावी, बोरीवलीत कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शस्त्रांसह लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन टोळ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई ...

कुर्ला, धारावी, बोरीवलीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शस्त्रांसह लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन टोळ्यांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. धारावी, कुर्ला, बोरीवली परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली.

बोरीवलीच्या देवीपाडा येथील एका सराफाच्या दुकानावर लुटीच्या उद्देशाने आलेल्या त्रिकुटाला कस्तुरबा पोलिसांनी ताब्यात घेतले. राजेश सिंग (२२) धर्मेंद्र सिंग (२२) आणि आकाश गायकवाड (१९) अशी अटक आराेपींची नावे आहेत. राजेश आणि धर्मेंद्र अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या अन्य दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

दुसऱ्या घटनेत विनोबा भावेनगर परिसरातील चाैघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींच्या झडतीत पोलिसांना एक देशी कट्टा, दोन चाकू सापडले. मेहुल अरुंदेकर (२४), विजय वेलजी पटेल ऊर्फ कटल्या (३३), अजय वेलजी पटेल ऊर्फ अज्या (३२), मोहम्मद इम्रान मोहम्मद अली शेख (२९) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तर, तिसऱ्या कारवाईत धारावीतून अन्वर हुसेन मोइनुद्दीन शेख (३७), बाबू मदिला (३५), अमित शिंदे (३५), अनिलकुमार जाटप (३२) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकड़ून एका देशी कट्ट्यासह जिवंत काडतुसे, चाकू, तलवार, मिरची पावडर जप्त करण्यात आली. अटक आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

.....................................................