अभिजित कोळपे, पुणेवाढत्या औद्योगिकीकरणाचा सर्वाधिक ताण पुणे-नगर महामार्गावर आला असून, या रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाघोली, कोरेगाव भीमा आणि शिक्रापूर येथील चौकात उड्डाणपुलाची आवश्यकता भासू लागली आहे़ या तीन ठिकाणी पूल झाल्यास नगर रोडवरील सध्याची वाहतूककोंडी टाळता येऊ शकते.पुणे शहराची हद्दवाढ झाल्यानंतर सर्व मोठ्या कंपन्यांची गोदामे वाघोली परिसरात हलविली गेली़ परिणामी येथे कंटेनर, ट्रेलरची वाहतूक अधिक होऊ लागली़ त्याच वेळी वाघोलीची वाढ झाल्याने गावातील वाहनांच्या संख्येत मोठी भर पडली आहे़ पुण्याहून निघालेल्या वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याने त्यांना वाघोलीतूनच प्रवास करावा लागतो़ त्यामुळे येथे वाहूतक कोंडी होते.औद्योगिकीकरणामुळे हीच परिस्थिती शिक्रापूर आणि कोरेगाव भीमा येथे आहे़ या वाहतूककोंडींवर तातडीचा उपाय म्हणजे उड्डाणपूल असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ तो झाल्यास जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची वेळ येणार नाही़ वाघोली परिसरात वाघेश्वर मंदिर, भावडी-तुळापूर फाटा, बाजारतळ, आव्हळवाडी फाटा आणि केसनंद फाटा चौकात वाहतूककोंडीने वाहनचालकांबरोबर प्रवासी हैराण झाले आहेत. त्यातच मंगळवारी आठवडे बाजाराच्या दिवशी, तर या प्रमुख चौकांमध्ये कासवगतीने वाहने पुढे सरकतात. कोरेगाव भीमा, सणसवाडी परिसरात औद्योगिक कारखाने आणि गुरुवारी भरणारा कोरेगावचा आठवडी बाजार यामुळे येथे नेहमीच वाहतूककोंडीचा प्रश्न भेडसावत आहे. पुढे आठ किलोमीटरवर शिक्रापूर येथे चाकण चौक आणि पाबळ चौकामध्ये रस्ते ३० फुटी झाले आहेत. मात्र फेरीवाले आणि टपरीधारकांनी अतिक्रमण केल्याने या ठिकाणी दहा फूट रस्ताच वापरायला मिळत आहे. त्यामुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसेच औरंगाबाद, अहमदनगर, कर्जत, जामखेड, सोलापूरहून दौंडमार्गे चाकण, मुंबईच्या दिशेने जडवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. बऱ्याचदा मोठे कंटेनर हे रस्त्यावरच उभे असतात. पाबळ आणि चाकण चौकाबरोबर पुढे वेळ नदीवर पुलांमुळे बऱ्याचदा शिरूरच्या दिशेने तीन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे प्रवाशांबरोबर स्थानिक नागरिक त्रस्त असून, चाकण चौकात उड्डाणपूलाची मागणी होत आहे.
कोंडी टाळण्यासाठी हवेत तीन उड्डाणपूल
By admin | Updated: December 26, 2014 23:23 IST