मुंबई : हार्बर मार्गावर सध्या नऊ डबा लोकलसाठीच प्लॅटफॉर्म असून बारा डबासाठी विस्तारीकरणाची कामे स्थानकांवर सुरू आहेत. यासाठी सीएसटीवर हार्बरच्या प्लॅटफॉर्मचेही विस्तारीकरण केले जाणार असून डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात दोन प्लॅटफॉर्म तीन दिवस बंद ठेवले जाणार आहेत. यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर बारा डबा लोकल धावत असून अद्याप हार्बर मार्गावर नऊ डबा लोकलच धावत आहेत. त्यामुळे हार्बरवर बारा डबा लोकलसाठी सगळ्या स्थानकांवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. वर्षभरापासून हार्बरवरील काही स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण केले जात आहे. यात सीएसटी स्थानकातील हार्बरसाठीच्या दोन प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात तीन दिवस हे दोन्ही प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी बंद ठेवून त्याची वाहतूक कुर्ला किंवा वडाळा स्थानकातून सुरू ठेवण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले की, हा निर्णय अजून झाला जरी नसला तरी लवकरच या कामावर शिक्कामोर्तब होईल. (प्रतिनिधी)