Join us  

पालघर जिल्ह्यात एक कोटीच्या गुटखा तस्करीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 9:06 PM

एकीकडे राज्यात गुटखा बंदी असताना, तो चोरट्या मार्गे आणला जात आहे. या तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल होत असले तरी, ही तस्करी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते.

ठळक मुद्दे १० जणांविरोधात गुन्हा दाखलट्रकमालकाचाही समावेश; तो गुटखा मुंबई आणि ठाण्यात येणार होता?

ठाणे : पालघर जिल्ह्यात पकडलेला एक कोटीहून अधिक किमतीचा गुटखा हा मुंबई आणि ठाण्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची शक्यता अन्न व औषध विभागाने वर्तवली आहे. याप्रकरणी ट्रकचालकासह मालक आणि यामध्ये सहभागी असलेल्या एकूण १० जणांविरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर, गुटखा घेऊन राज्यात येणारे ट्रकचालक मनीष मौर्य, रामजित सरोज आणि सुशीलकुमार राममिलन या तिघांना अटक केली असून त्यांना (२४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.गुजरात राज्यातून गुटखा ट्रकमधून पालघर जिल्ह्यातील अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील चारोटीनाक्यावरून येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. त्यानुसार, सापळा रचून पकडलेल्या तीन ट्रकमध्ये एक कोटी पाच लाख ९६ रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. त्या ट्रकसह ५०२ गोण्यांतील मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला. तसेच त्या तीन ट्रकचालकांसह तिन्ही ट्रकमालक आणि यामध्ये सहभागी असलेले प्रथमदर्शी निदर्शनास आलेल्या एकूण १० जणांविरोधात भा.दं.वि कलम ३२८ सह अन्न सुरक्षा मानवी कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच हा गुटखा नेमका कुठे नेला जाणार होता. तसेच तो कोणी मागवला होता. याचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी कोणी दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली. याप्रकरणी कासा पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘‘आतापर्यंत १० जणांविरोधात भादंवि कलमान्वये गुन्हे दाखल होण्याची बहुधा राज्यातील पहिलीच वेळ असावी. त्यामध्ये ट्रकमालक-चालक आणि सहभागी असलेल्या १० जणांविरोधात भादंवि तसेच अन्न सुरक्षा मानवी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून त्या ट्रकचालकांना अटक केली आहे.’’- सुनील भारद्वाज, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (दक्षता) विभाग, गुप्तवार्ता 

टॅग्स :ठाणेपोलिसअन्न व औषध प्रशासन विभाग