Join us  

साडेतीन लाख घरांना महामुंबईत ग्राहक मिळेना; काही भागांत मार्केटपेक्षा रेडी रेकनरचे दर जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 6:22 AM

घरांच्या विक्रीला ब्रेक?

- मनाेज गडनीस

मुंबई : रेडी रेकनरचे दर वाढवण्याच्या हालचाली सरकार दरबारी हाेत असताना एमएमआर क्षेत्रामध्ये  ३ लाख ४० हजार तयार घरे विक्रीविना पडून आहेत. त्यातच एप्रिल महिन्यापासून रेडी रेकनरचे दर किमान १० ते १५ टक्के वाढल्यास नव्याने तयार हाेणाऱ्या घरांच्या विक्रीलाही त्याचा फटका बसेल, अशी भीती गृहनिर्माण वर्तुळातील तज्ज्ञांना आहे. 

गृहनिर्माण क्षेत्रातील लिआसेस फोरा या कंपनीने  सप्टेंबरमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार यासह एकूणच एमएमआर क्षेत्रामध्ये विक्रीविना पडून असलेल्या घरांची संख्या  लाखात आहे. या घरांचे आकारमान, तेथील किमती यामुळे या घरांना ग्राहकच मिळत नाहीत. दोन वर्षे कोरोनामुळे अर्थचक्र थंडावले. त्याचाही फटका घरांच्या विक्रीला बसला होता. 

९ महिन्यात अडीच टक्क्यांनी गृहकर्जावरील व्याजदर वाढले आहेत. यामुळे अनेकांची घर खरेदी स्वप्नातच आहे. पुरवठा जास्त, मागणी कमी, असे सध्याचे चित्र आहे. त्यातच रेडी रेकनरचे दर वाढल्यास घरे महागतील. रेडी रेकनरचा दर वाढल्यास मुद्रांक शुल्काच्या रकमेतही वाढ होईल, परिणामी घरांच्या किमती आणखी वाढणार आहेत.

कर्जापेक्षा भाड्याचे घरच बरे...

मध्यमवर्गीयाला जर मुंबईत घर घ्यायचे तर किमान २ ते ८ कोटी रुपये किंवा त्याहीपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. स्वाभाविकच त्यासाठी कर्ज काढले जाते आणि त्याचे आयुष्य कर्जफेडीत संपते.कर्जाचे हप्ते आणि त्या घरासाठी वार्षिक कर यामुळे मासिक उत्पन्नातील बराचसा भाग खर्ची पडतो.जोवर त्या घरात आपण राहतो तोवर एकप्रकारे त्या घराची किंमत कागदोपत्रीच असते. ते घर विकले किंवा भाड्याने दिले (भाडे देखील इएमआयपेक्षा जास्त आले) तरच ते परवडते.या तुलनेत कोणत्याही कटकटीशिवाय केवळ महिन्याचे लाईटबिल भरून भाड्याने घर घेऊन राहणे मुंबईकरांसाठी तरी सध्या सुखाचे ठरत आहे.

सर्वाधिक फटका परवडणाऱ्या घरांना?अनेक बिल्डरांनी मध्यम श्रेणी किंवा परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीवर भर दिला आहे. मुंबईमध्ये यातील बहुतांश प्रकल्प हे उपनगरांत आहेत. त्यामुळे काही प्रकरणांत तेथील रेडी रेकनरचे दर हे दक्षिण मुंबईपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते. रेडी रेकनरची दरवाढ झाल्यानंतर त्याचा फटका प्रामुख्याने परवडणाऱ्या दरातील घरांना बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :मुंबई