Join us

असीम सरोदे यांना ठार मारण्याची धमकी

By admin | Updated: February 20, 2015 01:29 IST

मानवी हक्क संरक्षणाकरिता गेली १६ वर्षे कार्यरत असणारे अ‍ॅड. असीम सरोदे यांना समाजकंटक व धर्मांध व्यक्तींकडून धमक्या येऊ लागल्या आहेत.

अलिबाग : मानवी हक्क संरक्षणाकरिता गेली १६ वर्षे कार्यरत असणारे अ‍ॅड. असीम सरोदे यांना समाजकंटक व धर्मांध व्यक्तींकडून धमक्या येऊ लागल्या आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर याचे गांभीर्य वाढले आहे.रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कार व वाळीत प्रथेविरोधात अ‍ॅड. सरोदे यांनी श्रीवर्धन न्यायालयापासून मुंबई उच्च न्यायालयापर्यंत न्यायाची लढाई सुरू ठेवली आहे. ८ फेब्रुवारीला अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेच्या ‘सामाजिक बहिष्कार व वाळीत प्रथा परिषदेत’ त्यांनी परखड भूमिका मांडली होती. तेव्हापासून धमक्या दिल्या जात आहेत.पोलीस संरक्षण अपेक्षित नाही. मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून आणि कॉ. पानसरे यांच्यावरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही माहिती कळविणे माझी जबाबदारी असल्याचे सरोदे यांनी गृहराज्यमंत्री राम शिंदे व रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)